Engineer Rashid, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Engineer Rashid : जेलमधून 5 वर्षांनी बाहेर येताच ‘या’ नेत्याला आठवले राहुल गांधींचे ते 2 शब्द; भाजपचं टेन्शन वाढलं

Rajanand More

New Delhi : जम्मू-काश्मीरमधील अवामी इत्तेहात पक्षाचे नेते व खासदार इंजिनिअर रशीद बुधवारी तब्बल पाच वर्षांनंतर जेलमधून बाहेर आले. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी 2 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता ते प्रचारात सक्रीय होणार असल्याने प्रामुख्याने भाजपचे टेन्शन वाढणार आहे.

शेख अब्दुल रशीद हे इंजिनिअर रशीद नावाने काश्मीरमध्ये ओळखले जातात. टेटर फंडिगच्या आरोपाखाली त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने 2019 मध्ये अटक केली होती. ते तिहार जेलमध्ये होते. जेलमधून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली आणि जिंकलीही. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा रशिद यांनी पराभव केला आहे. आता विधानसभा निवडणुकीतही रशीद यांच्या पक्षाने अनेक मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.

रशीद यांनी तुरुंगातून बाहेर येताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ते दोन शब्द बोलून दाखवले. जेलबाहेर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर हल्ला चढवला. मोदींच्या नव्या काश्मीरच्या नॅरेटिव्हविरोधात लढणार असल्याचे ते म्हणाले.

‘नवे काश्मीर हे नॅरेटिव्ह पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 5 ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी जे केले, त्याला लोकांनी स्वीकारले नाही. मी माझ्या लोकांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी कटिबध्द आहे. मोदींना सांगू इच्छितो की, डरो मत आणि डराओ मत,’ असे आव्हान रशीद यांनी दिले आहे. राहुल गांधी यांच्याकडूनही सातत्याने डरो मतचा नारा दिला जातो.

रशीद यांनी भाजपसह इंडिया आघाडीचाही समाचार घेतला. ते म्हणाले, आम्ही घाबरणार नाही. माझी लढाई ओमर अब्दुलांपेक्षा मोठी आहे. त्यांची लढाई खुर्चीसाठी आहे. माझी लोकांसाठी. माझ्यासाठी सरकार नव्हे, काश्मीर मुद्दा आहे. मी भाजपची शिकार आहे. मी अखेरच्या श्वासापर्यंत मोदींच्या विचारधारेविरोधात लढेन. निवडणुकीत मला एनडीए किंवा इंडिया आघाडीशी काही देणेघेणे नाही. मी काश्मीरमध्ये लोकांना एकजुट करायला येणार असल्याचे रशीद यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT