Jharkhand Assembly Election Sarkarnama
देश

Jharkhand Assembly Election: ‘कोल्हान टायगर’ विरोधकांना जड जाणार अन् भाजपला तारणार? 43 मतदारसंघात लागणार कस

First phase of voting in Jharkhand begins in 43 constituencies: झारखंडमध्ये बुधवार पहिल्या टप्प्यात 43 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

Rajanand More

Ranchi News : झारखंड विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. बुधवारी राज्यातील 15 जिल्ह्यांतील 43 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मात्र, संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे ते कोल्हानकडे.

भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान कोल्हानचेच आहे. या भागात मागील निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र, आता त्यांच्यासोब कोल्हान टायगर म्हणून ओळखले जाणारे आदिवासी नेते, माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन आहेत. त्यामुळे भाजपची संपूर्ण मदार त्यांच्यावरच आहे.

काय आहे समीकरण?

कोल्हानमध्ये पूर्व सिंहभूम, पश्चिम सिंहभूम आणि सरायकेला खरसावा हे जिल्हे आहेत. त्यामध्ये विधानसभेच्या 14 जागा असून त्यापैकी 9 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. मागील निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँगेसच्या आघाडीने 13 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 11 जागा जेएमएम आणि दोन जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या.

एका जागेवर सरयू राय हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांचा पराभव करत ते जायंट किलर ठरले होते. त्यामुळे भाजपवर नामुष्की ओढवली होती. आता या भागात विजय मिळवण्यासाठी भाजपने चंपई सोरेन झाऱखंड मुक्ती मोर्चातून फोडत पक्षात आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व बड्या नेत्यांनी सभा घेतल्या आहेत.

कोल्हानमध्ये भाजपने बड्या नेत्यांच्या नातेवाईकांनाही मैदानात उतरवले आहे. चंपई सोरेन हे सरायकेलामधून तर त्यांचे पूत्र बाबूलाल सोरेन घाटशिला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा, ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांच्या सून पूर्णिमा साहू मैदानात आहेत.

कोल्हानप्रमाणेच पलामू, संथाल परगना, उत्तर छोटानागपूर, दक्षिण छोटानागपूर विभागांतही मतदान होणार आहे. यापैकी सर्वाधिक 25 जागा उत्तर छोटानागपूर विभागात आहेत. मागील निवडणुकीत या भागात भाजपला 32 टक्के तर काँग्रेस आघाडीला 31 टक्के मते मिळाली होती. पाचपैकी केवळ संथाल आणि कोल्हानमध्येच जेएमएमने मोठी आघाडी घेत राज्यात सत्ता काबीज केली होती. त्यामुळे कोल्हानमध्ये विजयासाठी भाजपने कंबर कसली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT