Jharkhand Politics  Sarkarnama
देश

Jharkhand Politics : झारखंडमध्ये 'राबडीदेवी' पॅटर्न; हेमंत सोरेन पत्नीला मुख्यमंत्री बनवणार?

Chetan Zadpe

Jharkhand News : झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चामधील (JMM) एका आमदाराने कोणतेही स्पष्टीकरण न देता राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींचा कयास लावला जात आहे. अचानक झारखंडच्या मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकार बदलणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना आता झारखंडच्या मुख्यमंत्रिपदावर आणण्याची तयारी सुरू असल्याचा दावा भाजपच्या गोटातून केला जात आहे. यामुळे गंडेया विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सर्फराज अहमद यांचा राजीनामा घेण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. याचे कारण म्हणजे कथित घोटाळा प्रकरणात हेमंत सोरेन यांनी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या (ED) तब्बल सात नोटीसांकडे दुर्लक्ष केले आहे. आता अशा स्थितीत सोरेन यांच्या अटकेची शक्यता वाढलेली आहे. सोरेन यांना अटक झाल्यास बिहारमधील लालू प्रसाद यादव यांनी यापूर्वी जसे त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री बनवले होते, त्याचप्रमाणे सोरेन त्यांच्या पत्नी कल्पना यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत आहेत, अशी शक्यता आहे.

हेमंत सोरेन यांना ईडीने आतापर्यंत सात वेळा समन्स बजावले होते. मात्र या समन्सला सोरेन यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर आता त्यांच्या पक्षाचे आमदार सर्फराज अहमद यांनी लगोलग राजीनामा दिला आहे. कल्पना सोरेन यांना निवडणूक लढवता यावी, यासाठी ही मोक्याची जागा रिकामी करण्यात आल्याचा भाजपचा दावा आहे. विधानसभा सदस्य नसलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री आणि मंत्री बनवता येते, पण मंत्री बनल्यापासून सहा महिन्यांत त्यांना निवडणूक जिंकून सभागृहात पोहोचावे लागते.

गंडेया ही आदिवासी, अल्पसंख्याक बहुल पण आरक्षित नसलेली जागा आहे. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या ओडिशाच्या रहिवासी आहेत, त्यामुळे त्यांना आरक्षित जागेवरून निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळेच आरक्षित नसलेल्या जागेचा राजीनामा दिल्याचे भाजपचे म्हणणे आहे. अल्पसंख्याक आणि आदिवासींचे प्राबल्य असल्याने ही जागा सोरेन यांच्यासाठी सुरक्षित मानण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्नीला मुख्यमंत्री करुन तुरुंगात जातील : मरांडी

हेमंत सोरेन यांना त्यांची पत्नी कल्पना यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, असा दावा भाजपचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी केला आहे. लालू प्रसाद यादव-राबडीदेवी यांचे उदाहरण देत ते म्हणाले, 'झारखंडमध्येही बिहारच्या जंगलराज युगाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा सोरेन यांचा प्रयत्न सुरू आहे. चारा घोटाळ्यातील लालू प्रसादजींच्या सर्व युक्त्या अयशस्वी झाल्या, तेव्हा राबडीदेवींना मुख्यमंत्री बनवून लालूजी तुरुंगात गेले. एकामागून एक शिक्षा होत होत्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात गेले.'

'घोटाळ्यांमुळे एका प्रकरणात अडकलेले सोरेन कुटुंबाचा राजपुत्र हेमंत सोरेन याच्या सर्व युक्त्या आणि आदिवासींची मालमत्ता, पाणी, जंगल, जमीन, डोंगर लुटून अल्पावधीतच अमाप संपत्ती जमवण्याची भूक आहे. जर त्यांना तुरुंगात जावे लागले तर त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करून स्वतः तुरुंगात जाण्याचा त्यांची योजना आहे. हेमंत सोरेन यांना माहीत आहे की, त्यांनी केलेले घोटाळे आणि चुकीच्या कामांमुळे त्याचे उर्वरित आयुष्य तुरुंगात जाणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT