Gulam Nabi Azad & Narendra Modi Latest  Sarkarnama
देश

पंतप्रधान मोदी माझ्याबद्दल चांगले बोलले म्हणून मी काही त्यांच्या विचारांचा होत नाही...

Gulam Nabi Azad : आमचे पूर्वज सहाशे वर्षांपूर्वी काश्मिरी पंडित होते,असे आझाद यांनी म्हटले आहे.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : संसद सदस्यही माणसे असतात हे राजकारणात सोयीस्कररीत्या विसरले जाते. राज्यसभेतील माझ्या निरोप समारंभात बोलणारे पंतप्रधान आणि त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून माझ्याबद्दल चांगले उद्गार काढले म्हणून मी काही त्यांच्या विचारांचा होत नाही आणि होणारही नाही. मी संपूर्ण राजकीय आयुष्यात कधीही धर्माच्या नावाने नव्हे, तर राज्यघटनेची शपथ घेऊन कामकाज केले, अशा शब्दात ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी आपली भावना मांडली.

काश्मिरी मुलांच्या शिक्षणासाठी दीर्घकाळ कार्यरत असलेली सरहद संस्था आणि चिनार प्रकाशन यांच्या वतीने 'मून्स ऑफ द सेफ्राॅन फील्ड्स' या प्राण किशोर कौल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आझाद आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल, पद्मविभूषण एन एन व्होरा यांच्या हस्ते झाले, त्या वेळी आझाद बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक शफी शौक, मुश्ताक मोटा, डॉ शैलेश पगारिया, मुस्ताक अली, सरहदचे संस्थापक संजय नहार, साहित्य अकादमीचे सचिव डाॅ के. श्रीनिवास राव आदी उपस्थित होते. (Gulam Nabi Azad & Narendra Modi Latest)

आझाद यांच्या प्रस्तावित नव्या पक्षाच्या स्थापनेच्या पूर्वसंध्येला दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात ते काय बोलतात याबद्दल उत्सुकता होती. आझाद यांनी थेट राजकीय भाष्य करण्याचे टाळले. जम्मू आणि काश्मीर असे दोन भाग झाले त्यानंतर या राज्याचा दर्जाच केवळ गेला असे नसून येथील सर्वंकष- समग्र संस्कृतीचेही दोन भाग झाले हे दुःखद आहे, अशी भावना व्यक्त करून आझाद यांनी जम्मू -काश्मीरमधून कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याला आपला विरोध असल्याचा पुनरुच्चार केला. सव्वादोन वर्षांपूर्वी राज्यसभेत हे विधेयक मोदी सरकारने मंजूर करून घेतले तेव्हा भारतीय लोकशाहीसाठी तो काळा दिवस असल्याची भावना त्यांनी यापूर्वीच संसदेच्या पटलावर व्यक्त केली होती.

आम्ही शाळेत असताना रेडिओ काश्मीर च्या काळापासून कौल हे आमचे हिरो होते असे सांगून आझाद म्हणाले की “गुल गुलशन गुलफाम” यासारख्या अनेक उत्तमोत्तम कलाकृती कौल यांच्या लेखणीतून उतरल्या. काश्मिरी संस्कृतीचे ते वाहक आहेत. काश्मिरी संस्कृतीला ओळख देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आमचे पूर्वज सहाशे वर्षांपूर्वी काश्मिरी पंडित होते आणि आमचे मूळ नाव भट होते हे मी संसदेतही सांगितले आहे. उर्वरित भारतातील मुस्लिम आणि काश्मिरी मुस्लिम याच्यात फरक असा की काश्मिरी मुसलमानांनी धर्म बदलला तरी भट्ट, कौल, रैना यासारखी आपली आडनावे शतकानुशतके कायम ठेवली आहेत. दिल्लीत आपण वर्षानुवर्षे दिवाळी आणि ईद मिलन सोहळा करीत असो तेव्हा इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी हे सगळे यायचे. आता भाषा आणि सण हेही धर्माच्या आधारावर विभागले गेले याची खंत वाटते,असे आझाद म्हणाले.

96 वर्षीय कौल यांनी आपल्या जीवनाचा आलेख मांडला. ही कादंबरी म्हणजे एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला येऊन विख्यात कश्मीरी कवयत्री असा लौकिक असलेल्या हब्बा खातून यांचा जीवनपट असल्याचे त्यांनी सांगितले. हे पुस्तक म्हणजे काश्मीरी संस्कृतीची नवी ओळख आहे आणि ती करून घेण्यासाठी भारतीयांनी ते जरूर वाचले पाहिजे असे सांगून एन एन व्होरा म्हणाले की आपल्या राज्यपाल पदाच्या काळात आपण काश्मिरी नागरिकांच्या मनात भारताबद्दल असलेला दुरावा कमी करण्याचे प्रयत्न केले. यासाठी लाहोरला असताना उर्दूतून घेतलेल्या शालेय शिक्षणाचा मोठा फायदा झाला. नहार यांनी प्रास्ताविक करताना काश्मीरचे देश आणि महाराष्ट्राची नाते यापुढे आणखी घट्ट होईल,असा विश्वास व्यक्त केला. डॉ पगारिया यांनी आभार मानले.

नहार हे काश्मीरमधील राज्यपाल !

आझाद यांनी वेळेअभावी भाषण लवकर संपवून ते खाली बसले. इतक्यात त्याचे लक्ष नहार यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी उस्फूर्तपणे भावना मांडल्या. आपण मुख्यमंत्री असताना काश्मीरमध्ये दहशतवाद जोरात होता तेव्हा नहार यांनी 500 काश्मीरी मुलांना दत्तक घेऊन शिक्षणासाठी पुण्यात आणले. त्यावेळी या मुलांचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना महाराष्ट्रात नेत आहेत, अशी ओरड उठली होती. मात्र मी त्या सर्वांकडे दुर्लक्ष केले. नहार हे भारताचे काश्मीरसाठीचे राज्यपालच आहेत असेही आझाद यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT