तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी स्थापन केलेल्या नव्या राजकीय चळवळीला सुरुवातीलाच मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अन्नामलाई यांनी सांगितले की, ‘इधु नम्मा इयक्कम’ या नव्या पक्षाची घोषणा झाल्यानंतर केवळ 10 तासांत 10 लाखांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे.
अन्नामलाई यांनी या उपक्रमाला केवळ राजकीय पक्ष नव्हे, तर जनतेच्या सहभागातून उभे राहिलेले आंदोलन असे म्हटले आहे. राज्याच्या विकासासाठी समान विचार आणि स्पष्ट ध्येय घेऊन ही चळवळ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नव्या राजकीय वाटचालीची घोषणा करण्यात आली.
अन्नामलाई यांच्या निर्णयाला काही भाजप नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष करु नागराजन यांनीदेखील पक्षाचा राजीनामा देत अन्नामलाई यांच्या भूमिकेला समर्थन जाहीर केले. राज्यातील अनेक नेते आणि कार्यकर्ते या नव्या चळवळीत सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या पक्षाची घोषणा करताना अन्नामलाई यांनी 2031 मधील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी ‘We The Leaders’ या नव्या व्यासपीठाची सुरुवात केली असून नागरिकांना राजकारणात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कोयंबतूरमध्ये नैतिकता आणि राजकारण या विषयांवर संशोधन करणारी संस्था उभारण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
अन्नामलाई यांनी आपल्या भूमिकेबाबत बोलताना तामिळनाडूमध्ये राजकीय बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे म्हटले. सत्ताकेंद्रित आणि घराणेशाहीवर आधारित राजकारणाला पर्याय देत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेला जुन्या राजकीय पद्धतींचा कंटाळा आला असून नवीन नेतृत्वाची अपेक्षा वाढल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. पक्षाने अनेक जागांवर उमेदवार उभे केले असले तरी केवळ 1 जागेवर विजय मिळवता आला. त्यानंतर अन्नामलाई पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता नव्या पक्षाच्या स्थापनेनंतर तामिळनाडूच्या राजकारणात पुढे कोणते बदल घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.