Congress  Sarkarnama
देश

Cabinet Expansion : मंत्र्याची विकेट पडताच काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, मंत्रिपदासाठी इच्छुकांची दिल्लीकडे धाव; महिला आमदाराचे नाव चर्चेत

Karnataka Congress Cabinet Expansion : शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नागेंद्र यांची विकेट पडल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. रिक्त झालेल्या मंत्रिपदांसाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे.

सरकारनामा ब्युरो

Karnataka Cabinet Woman Minister News : मंत्री बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, रिक्त झालेल्या मंत्रिपदांसाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात सध्या दोन पदे रिक्त असून, या जागांवर कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान नागेंद्र यांच्या जागी महिला प्रतिनिधी म्हणून अन्नपूर्णा तुकाराम यांना मंत्रिपद देण्याचा विचारही सुरू आहे.

शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी काँग्रेसला मोठ्या नाराजीचा सामना करावा लागला होता. तर नाराज झालेल्या काही वरिष्ठ आमदारांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. आता नागेंद्र यांच्या जागी या वरिष्ठ आमदारांना संधी द्यायची की वाल्मीकी समाजातील प्रतिनिधीला मंत्रिपद द्यायचे, यावर काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर विद्यमान मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व मिळालेले नसल्याने महिला आमदारालाही संधी देण्याची मागणी जोर धरत आहे.

यामुळे मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यात जे होऊ शकले नाही ते तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पण यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तार देखील काँग्रेस नेतृत्वासाठी सोपा नसल्याचे आता समोर येत आहे. तर नाराज असलेले वरिष्ठ आमदार एम. कृष्णाप्पा यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे लागेल, अशीही पक्षांतर्गत चर्चा आहे. कृष्णप्पा यांच्यासाठी जागा निर्माण करण्यासाठी वक्कलिग समाजातील एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, संबंधित मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने तिसऱ्या टप्प्यातील विस्ताराची गुंतागुंत वाढली आहे.

दरम्यान, नागेंद्र यांच्या जागी वाल्मीकी समाजातील तसेच महिला प्रतिनिधी म्हणून अन्नपूर्णा तुकाराम यांना मंत्रिपद देण्याचा विचारही सुरू आहे. त्यामुळे महिला आणि वाल्मीकी समाज या दोघांनाही प्रतिनिधित्व मिळू शकते. मात्र, प्रथमच निवडणूक लढवून, त्यातही पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या अन्नपूर्णा तुकाराम यांना थेट मंत्रिपद देण्यास काँग्रेसमधील काही नेत्यांचा विरोध असल्याचे समजते. एक जागा कुरुब समाजातील बसवराज नीलण्णा शिवण्णावर यांना द्यावी, यासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दबाव आणल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पेचावर कोणता तोडगा काढते, याकडे लक्ष लागले आहे.

शिवकुमार पुन्हा दिल्लीला

शिवकुमार यांनी मंत्री नागेंद्र यांच्या राजीनाम्यासह मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर दोन दिवसांपूर्वी दिल्ली दौरा करून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. राहुल गांधी यांनी पुन्हा सोमवारी (ता. ३१) दिल्लीला येण्याचे निर्देश देत तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेऊ, असे सांगितल्याचे समजते. त्यानुसार शिवकुमार सोमवारी पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. तर मंत्रिपदावर लक्ष ठेवून असलेल्या अनेक आमदारांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे.

लवकरच महिला मंत्र्यांची नियुक्ती

दरम्यान मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याचा विषय आता संपला असून, काँग्रेस सरकार भक्कम आहे आणि पुढेही भक्कम राहील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री तथा बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. तसेच रिक्त झालेल्या पदावर नागेंद्र यांच्या समाजातील व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. मात्र, त्याबाबतचा निर्णय सरकार घेईल, असे स्पष्ट करताना राज्यात लवकरच महिला मंत्र्यांची नियुक्ती केली जाणार असून, पक्षाकडून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही संकेत त्यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT