

New Dehli News : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या काही दिवसापासून रखडला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र,अधिवेशन संपताच वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात तीन जणांनी राजीनामा दिला आहे. आणखी दोघांच्या राज्यसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करत असताना काही जणांना वगळले जाण्याची शक्यता आहे. तर काही मंत्र्यांकडे असलेली अतिमहत्त्वाची खाती कमी करून, त्यांच्याकडे कमी महत्त्वाची खाती दिली जाण्याची शक्यता आहे, तर काही मंत्र्यांकडे असलेली जबाबदारी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच असलेल्या विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संधी दिली जाणार आहे तर द्रमुक व राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिली जाणार का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील वर्षी होणाऱ्या सात राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा विचार करून घेतला जाईल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेश मधील निवडणुकांचा विचार करता उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक किंवा केशव प्रसाद मौर्य यांच्यापैकी एकाला केंद्रात संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे अमरपाल मौर्य यांना ओबीसी मोर्चाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता सध्या केंद्रात मंत्रिपदासाठी केशव प्रसाद मौर्य यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, तर दुसरीकडे केशव प्रसाद मौर्य यांना ब्रजेश पाठक यांचा देखील पर्याय आहे, त्यामुळे दोन्ही पैकी एकाला केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंचे सहा खासदार सोबत घेतल्याने एकनाथ शिंदे यांचे बळ वाढले आहे. त्यामुळे शिवसेनेला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळणार आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे बारणे यांच्यापैकी एकाची तर राज्यमंत्रिपदासाठी ओम राजेनिंबाळकर व संजय जाधव यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर खासदारांची बैठक पार पडली. यामध्ये केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चा झाली असून यामध्ये दोन नावे फायनल झाली असल्याचे समजते. त्यासोबतच येत्या काळात होत असलेल्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद दिले जाणार का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विशेष: दक्षिणेकडील राज्याच्या महिलांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. पीयूष गोयल यांच्याकडे पक्षाने कोषाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. परंतु तरी देखील ते मंत्रिपदावर कायम राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग बिट्टू यांनी राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळही नोव्हेंबरमध्ये संपत आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ येत्या 25 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी मिळणार की नाही हे अजून स्पष्ट नाहीये, त्यांना जर पुन्हा राज्यसभेची संधी मिळाली नाही तर त्यांना मंत्रिपद सोडावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.