BJP Cross Voting Controversy : कर्नाटकातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील काही आमदारांनीच क्रॉस व्होटिंग केल्याच्या संशयावरून आता भाजपचे वरिष्ठ नेते थेट दिल्ली दरबारात हजेरी लावणार आहेत. विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र हे आज दिल्लीला रवाना होत असून, ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासमोर संपूर्ण अहवाल सादर करणार आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपमध्ये (BJP) अंतर्गत नाराजी वाढल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र केंद्रीय नेतृत्व नाराज होऊन आम्हाला दिल्लीला बोलावले, हा दावा फेटाळताना आर. अशोक यांनी स्पष्ट केले की, असे काहीही नाही. आम्ही स्वतः भेटीसाठी वेळ मागितला आहे. राज्यात याआधीही अनेकदा क्रॉस व्होटिंगची प्रकरणे घडली आहेत.
दरम्यान, क्रॉस व्होटिंग करणारे आमदार (MLA) कोण आहेत, हे शोधण्यासाठी भाजप आमदारांची धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथ स्वामी मंदिरात शपथ घेण्याची कल्पना प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मांडली होती.
मात्र पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी धार्मिक स्थळाचा राजकारणासाठी वापर होऊ नये, असा स्पष्ट सल्ला दिल्याने हा प्रस्ताव वादात सापडला. तसेच धर्मस्थळ येथे शपथविधी घेण्याच्या प्रस्तावाला माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा, माजी मंत्री सुरेश कुमार आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी विरोध दर्शविला आहे.
गुरुवारी झालेल्या सात विधान परिषद जागांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने 5 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, धर्मनिरपेक्ष जनता दल (JDS) आपल्या एकमेव उमेदवारालाही विजयी करू शकला नाही. निकालानंतर भाजप आणि JDS मधील काही आमदारांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला अपेक्षित 140 मतांऐवजी तब्बल 151 मते मिळाली. त्यामुळे विरोधकांच्या गोटात घोडेबाजार झाल्याच्या आरोपांना जोर चढला आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना आर. अशोक म्हणाले, काही जण हे मतदारसंघाच्या विकासासाठी केल्याचा दावा करत आहेत. पण हा विकास मतदारसंघाचा नाही, तर काहींचा वैयक्तिक विकास आहे. या घोडेबाजारात सहभागी झालेल्यांना माफ केले जाणार नाही.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी भाजपवर टोला लगावत, धर्मस्थळात गेल्यावर भाजप आमदार सत्य बोलतील का? असा सवाल उपस्थित केला. त्याला प्रत्युत्तर देताना आर. अशोक यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत म्हटले की, काँग्रेसने आमदारांना फूस लावून घोडेबाजार केला आहे.
याचे राजकीय परिणाम त्यांना लवकरच भोगावे लागतील. कर्नाटक भाजपमधील या नव्या राजकीय घडामोडींमुळे आता दिल्लीतील बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दोषी आमदारांवर कारवाई होणार का? याची उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.