CP Yogeshwara, Nikhil Kumaraswamy Sarkarnama
देश

Karnataka Bypolls : भाजपाला धक्का देत काँग्रेसने बड्या नेत्याला फोडले, कुमारस्वामींच्या मुलाविरोधात तगडा उमेदवार

Channapatna Assembly constituency: चन्नापटना विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून निखील कुमारस्वामी हे एनडीएचे उमेदवार असतील.

Rajanand More

Karnataka Politics : काँग्रेसने कर्नाटकात भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे पाचवेळचे आमदार व माजी मंत्री सी. पी. योगेश्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना चन्नापटना विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारीही देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मुलाला ते निवडणुकीत टक्कर देणार आहेत.

चन्नापटना हा कुमारस्वामी यांचा मतदारसंघ आहे. खासदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक होत आहे. योगेश्वर यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर कुमारस्वामी यांयाविरोधात शड्डू ठोकला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना विधान परिषेदवर पाठवण्यात आले होते.

योगेश्वर हे चन्नापटना पोटनिवडणुकीसाठी इच्छूक होते. मात्र, भाजपने तिकीट न दिल्याने त्यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर गुरूवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्जही दाखल केला आहे. एकीकडे ते अर्ज दाखल करत असतानाच जेडीएसकडून कुमारस्वामी यांचे पुत्र निखील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

निखील यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा कुमारस्वामी आणि योगेश्वर यांच्यामध्ये निवडणूक होणार आहे. योगेश्वर यांनी यापूर्वी पाचवेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी दोनदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. तसेच भाजप आणि समाजवादी पक्षासह अपक्ष म्हणूनही त्यांनी निवडणूक जिंकली आहे.

दुसरीकडे निखील यांनी यापूर्वी दोनदा निवडणूक लढली असून दोन्हीवेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकदा विधानसभा तर एका लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. योगेश्वर यांनी निखील यांच्या आईचाही एकदा पराभव केला आहे. आता निखील तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ते पराभवाची हॅटट्रिक करणार की पहिला विजय मिळवणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT