New Delhi News : महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक जागा मिळाव्यात, यासाठी झगडणाऱ्या काँग्रेसने उत्तर प्रदेशाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यूपीत होत असलेल्या नऊ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पक्षाने सपशेल माघार घेतली आहे. एकाही मतदारसंघात उमेदवार उभा केला जाणार नाही, असे पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले आहे.
उत्तर प्रदेशात नऊ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासह काँग्रेसला बंपर यश मिळाले. त्यानंतर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली होती. सुरूवातीला पक्षाने पाच जागांवर दावा ठोकला होता. पण हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि काँगेसची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा होती.
समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागा दिल्या जातील, असे सांगण्यात आले होते. पण काँग्रेस ते मान्य करणार नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडेल, अशी चर्चा होती. पण हरियाणात झालेल्या चुका इतर राज्यांत टाळण्यासाठी काँग्रेसने इंडिया आघाडीत बिघाडी होऊ नये, यासाठी दक्षता घेतली आहे.
काँग्रेसने उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत एकाही मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय़ घेतला आहे. याविषयी माहिती देताना पक्षाचे राज्याचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशसह देशातील राजकीय आणि सामाजिक तणावर वाढला असून त्याविरोधात इंडिया आघाडी एकत्र आली आहे. आम्ही एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढली.
संघटना किंवा पक्षवाढीचा प्रश्न नाही. आम्ही उत्तर प्रदेशात एकही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयासाठी मदत करू. इंडिया आघाडी एकत्र राहावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा करण्याआधीच अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीचे सर्व नऊ उमेदवारी समाजवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतील, असे बुधवारी जाहीर केले होते. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एका मोठ्या विजयासाठी एकजुटीने उभी आहे. देशहितासाठी इंडिया आघाडीची ही एकजूट आज आणि उद्याही नवा इतिहास घडवेल, असे अखिलेश यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.