Basavraj Bommai
Basavraj Bommai Sarkarnama
देश

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा डिवचलं; म्हणाले, ''महाराष्ट्राला इंचभरही जमीन..!''

सरकारनामा ब्यूरो

Basavraj Bommai on Border Dispute : महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. त्यात आता कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Basavraj Bommai) यांनी कर्नाटकची इंचभरही जमीन महाराष्ट्राला देणार नाही असं विधान करत डिवचलं आहे. यामुळे सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्य त्यावर दावा करणार नाहीत असं विधान केलं होतं. मात्र,यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादाचा प्रश्न निकाली निघाली असून एक इंचही जमीन महाराष्ट्राला दिली जाणार नाही असं विधान कर्नाटक विधानसभेत केले आहे. तसेच सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम असल्याच्या कर्नाटकाच्या भूमिकेबाबत उद्या दोन्ही सभागृहात ठराव करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सीमावर्ती भागात संतापाची लाट उसळली आहे.

कर्नाटक विधानसभेत आज शून्य प्रहरावेळी सीमाप्रश्नावर आज प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभेत कर्नाटक सीमावादावर भाष्य केलं आहे. यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेश करण्याच्या सरकारच्या भूमिकेचंही सर्वपक्षीय समर्थन केले. यावेळी महाराष्ट्रातील नेते हे बेकायदा व बळजबरीने बेळगावात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत देखील काही नेत्यांनी व्यक्त केले.

विरोधकांनी केलेला बेळगावातील मराठी भाषिकांवर सरकारकडून अन्याय व दडपशाही होत असल्याचा आरोप सत्ताधारी सरकारने फेटाळून लावला आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी केवळ दोन्ही राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, लोकशाही देशात केंद्र सरकार दोन राज्यातील वाद सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्याना बोलावू शकते आणि त्यासंदर्भात सल्लाही देऊ शकते. त्यामुळे अमित शाह यांनीही तेच केले. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी केवळ दोन्ही राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचेही पालन आमच्या बाजूने करण्यात येत आहे. मात्र, सीमाप्रश्नी आमची भूमिका स्पष्ट आहे. कर्नाटकाची एक इंचही जमीन आम्ही महाराष्ट्राला देणार नाही असं त्यांनी आज स्पष्टपणे सांगितले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद निवळला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, कर्नाटक सरकारने बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली होती. तसेच महाराष्ट्राच्या नेत्यांना कर्नाटकात येण्यास मनाई केली होती. यावेळी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली होती. तसेच महामेळाव्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील सीमेवर रोखण्यात आले होते.

यावरुन महाराष्ट्रातले राजकारण देखील चांगलंच तापलं होतं. त्याचे तीव्र पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटत असतानाच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा सीमावादावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्राला इंचभरही जमीन महाराष्ट्राला देणार नसल्याचे स्पष्ट केले असून तसा ठराव देखील कर्नाटकच्या विधीमंडळात मांडण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT