Karnataka Congress Political Crisis News : विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारमध्ये आता फेरबदलाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. एकीकडे शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे विद्यमान मंत्र्यांपैकी एक-दोन जणांना वगळावे लागण्याची शक्यता आहे. यासाठी शिवकुमार दिल्लीला जाणार असून, रिक्त होणाऱ्या जागेवर कुरूब समाजातील बसवराज निरन्ना शिवण्णावर यांची नियुक्ती करावी, यासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दबाव वाढवल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
कर्नाटकातील कथित 90 कोटी रुपयांच्या वाल्मीकी विकास निगम घोटाळ्याप्रकरणी भाजपसह विरोधी पक्षांनी काँग्रेसवर राजकीय दबाव वाढवला आहे. या प्रकरणात भाजपने जोरदार आंदोलन केल्यानंतर आता कर्नाटकचे मंत्री बी. नागेंद्र यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे एकीकडे काँग्रेस सरकार बॅकफुटवर गेल्याची चर्चा आहे. तर शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात किरकोळ प्रमाणात फेरबदल करण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी नवी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावेळी मंत्रिपद न मिळाल्याने काही ज्येष्ठ आमदार नाराज आहेत. या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी मंत्रिमंडळात मर्यादित स्वरूपात फेरबदल करण्याचा विचार हायकमांडने यापूर्वीच सुरू केला होता. मात्र, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने हा निर्णय पुढे ढकलला होता.
सध्या मंत्रिमंडळात एका जागेव्यतिरिक्त सर्व मंत्रिपदे भरलेली आहेत. नाराज असलेल्या तीन-चार ज्येष्ठ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे झाल्यास विद्यमान मंत्र्यांपैकी एक-दोन जणांना वगळावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय, सध्याच्या मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व मिळालेले नसल्याने महिला आमदाराला मंत्रिपद देण्याचाही दबाव आहे.
त्यामुळे विद्यमान मंत्र्यांपैकी एक-दोन जणांना डच्चू मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाला वगळायचे आणि कोणत्या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिमंडळात संधी द्यायची, याबाबत चर्चा करण्यासाठी हायकमांड मुख्यमंत्री शिवकुमार यांना दिल्लीला बोलावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळातील रिक्त असलेल्या एका जागेवर कुरूब समाजातील बसवराज निरन्ना शिवण्णावर यांची नियुक्ती करावी, यासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दबाव वाढवल्याची चर्चा आहे. शिवण्णावर यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्यास होत असलेल्या विलंबाबाबत सिद्धरामय्या यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे.
फेरबदलाचे आव्हान
मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाला वगळायचे, यावर यापूर्वीही चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मात्र, एखाद्या मंत्र्याला पदावरून हटविल्यास त्यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस नेतृत्वासमोर मोठे आव्हान आहे. एकीकडे नाराज ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद देण्याचा दबाव, तर दुसरीकडे विद्यमान मंत्र्यांना हटविल्यास निर्माण होणारी संभाव्य नाराजी, अशा दुहेरी कोंडीत मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय अडकला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवकुमार यांनी नाराज ज्येष्ठ आमदारांची भेट घेतली होती. त्यावेळी यापैकी काही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यामुळे आता अधिवेशन संपल्यानंतर या नाराज ज्येष्ठ आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा दबाव वाढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.