Basavaraj Horatti Sarkarnama
देश

Vidhan Parishad Sabhapati : ‘मी राजीनामा देणार नाही; माझ्यावर अविश्वास आणा’ असे चॅलेंज देणाऱ्या विधान परिषद सभापतींचा अखेर राजीनामा

Karnataka Political News : अविश्वास ठरावाचे उघड आव्हान देणारे विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी अखेर राजीनामा दिला. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि बी. के. हरिप्रसाद यांच्याशी चर्चेनंतर निर्णय जाहीर केला.

सरकारनांमा ब्यूरो

Bengaluru, 07 August : ‘मी राजीनामा देणार नाही. आवश्यक वाटत असेल, तर माझ्याविरुद्ध तुम्ही अविश्वास ठराव आणावा,’ असे उघड चॅलेंज देणारे विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांच्याशी चर्चा केल्यानंतर होरट्टी यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी समजूत घातल्यानंतर विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सभापतिपदाचा राजीनामा आपण स्वेच्छेने देत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची खांदेपालट झाली आहे. डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर काँग्रेसने विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी आमदार सलीम अहमद यांची निवड केली होती. अहमद यांची निवड जाहीर केल्यानंतर विधान परिषद सभापतिपदावरून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला होता.

अहमद यांची निवड केल्यानंतर विद्यमान सभापती होरट्टी यांनी, ‘मी सभापतिपदाचा राजीनामा देणार नाही. तुम्हाला आवश्यक वाटत असेल, तर माझ्याविरुद्ध अविश्वास ठराव आणावा’, असे ओपन चॅलेंज होरट्टी यांनी काँग्रेस सरकारला दिले होते. त्यामुळे नवे सभापती म्हणून अहमद यांची निवड करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची झाली होती.

काँग्रेस पक्षाने विधान परिषदेत स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे पक्षाकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सभापतिपदासाठी सलीम अहमद यांची, तर उपसभापतिपदासाठी उमाश्री यांची निवड करण्यात आली होती. आगामी अधिवेशनात या दोन्ही पदांची औपचारिक निवड प्रक्रिया होणार आहे.

बसवराज होरट्टी हे भारतीय जनता पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (धजद) यांच्या पाठिंब्यावर विधान परिषदेच्या सभापतिपदी निवडून आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवकुमार यांनी त्यांना राजीनामा देण्याची विनंती काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीस ठाम नकार देत उलट होरटी यांनी अविश्वास ठराव आणावा, असे आव्हान दिले होते.

प्राणेश यांनी यापूर्वीच उपसभापतिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर काँग्रेसच्या उमाश्री यांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता होरट्टी यांनीही सभापतिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्याने दोन्हा पदावर काँग्रेसच्या आमदारांना संधी मिळणार आहे. पण नव्या सभापतीची निवडणूक होईपर्यंत होरट्टी हेच हंगामी सभापती असणार आहेत.

काँग्रेसने जबरदस्तीने राजीनामा घेतला : भाजप

दरम्यान, भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने गुंडागर्दी करून होरट्टी यांच्याकडून जबरदस्तीने राजीनामा घेतला आहे, असा दावा अशोक यांनी केला आहे.

काँग्रेस नेत्यांनी घातली समजूत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरिप्रसाद यांनी होरट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. या दोन्ही नेत्यांनी समजूत घातल्यानंतर अखेर होरट्टी यांनी सभापतिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT