Rajya Sabha Election Sarkarnama
देश

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष; खर्गेंची पुनर्निवड जवळपास निश्चित, देवेगौडांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम

Karnataka Rajya Sabha Election 2026 heats up Mallikarjun Kharge return looks certain while H.D. Deve Gowda candidature sparks BJP-JDS tensions : काँग्रेसमध्ये तीन जागांसाठी जोरदार लॉबिंग; डी. के. सुरेश यांचं नाव आघाडीवर, तर एनडीएमध्ये देवेगौडांच्या उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे.

Pradeep Pendhare

Rajya Sabha elections latest news : कर्नाटकातील आगामी राज्यसभा निवडणूक सध्या राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आली असून, दोन ज्येष्ठ नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पुनर्निवडीभोवती राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

खर्गे यांची पुनर्निवड जवळपास निश्चित मानली जात असताना, देवेगौडा यांच्या उमेदवारीबाबत मात्र भाजप-धजद आघाडीत संभ्रम आणि अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामध्ये कर्नाटकातील चार जागांसाठी मतदान होणार असून, सध्या त्या जागांवर मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), एच. डी. देवेगौडा, भाजपचे इराण्णा कडाडी आणि नारायण के. हे सदस्य आहेत. राज्यसभेच्या या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत स्पर्धा आणि एनडीएमधील समीकरणं यामुळे पुढील काही दिवस कर्नाटकचं राजकारण अधिक तापण्याची चिन्हं आहेत.

विधानसभेतील विद्यमान संख्याबळ पाहता काँग्रेसला (Congress) तीन जागा सहज मिळण्याची शक्यता आहे, तर भाजप-धजद आघाडीला एका जागेवर समाधान मानावं लागू शकतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

खर्गे यांची उमेदवारी जवळपास पक्की मानली जात असली तरी उर्वरित दोन जागांसाठी अनेक दिग्गज नेते दिल्लीदरबारी लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे. माजी खासदार डी. के. सुरेश यांचं नाव सध्या सर्वाधिक चर्चेत असून, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे आपल्या भावाला पुन्हा राष्ट्रीय राजकारणात संधी मिळवून देण्यासाठी सक्रिय असल्याचं बोललं जात आहे.

याशिवाय प्रा. राजीव गौडा, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, काँग्रेस नेते ए. पी. बसवराजू तसेच बीएमटीसी अध्यक्ष व्ही. एस. अराध्य यांचीही नावे चर्चेत आहेत. मुस्लिम समाजाकडून बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी उमेदवार मन्सूर अली खान यांनाही जोरदार पाठबळ मिळत असल्याची माहिती आहे.

देवेगौडांच्या पुनर्निवडीवर भाजपमध्येच मतभेद

एनडीएच्या कोट्यातून एच. डी. देवेगौडा यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी राज्य भाजपमधील काही वरिष्ठ नेते त्याला विरोध करत असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत देवेगौडा यांच्या उमेदवारीवरून मतभेद झाल्याचं समजतं.

भाजपकडे पर्यायी नावे तयार

माजी मुख्यमंत्री डी. व्ही सदानंदगौडा आणि माजी आमदार निर्मलकुमार सुराणा यांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पर्याय म्हणून पाठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देवेगौडांना महाराष्ट्रातून संधी?

राजकीय चर्चांमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब पुढे आली आहे. देवेगौडा यांना कर्नाटकाऐवजी भाजपशासित दुसऱ्या राज्यातून राज्यसभेत पाठवण्याचा पर्यायही तपासला जात असल्याचं बोललं जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. त्यामुळे एनडीएच्या रणनीतीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

विजयासाठी किती मतांची गरज?

कर्नाटक विधानसभेतील सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेसकडे सभापतींसह 135 आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपकडे 66, तर धजदकडे 18 आमदार आहेत. याशिवाय तीन अपक्ष सदस्य आहेत. दोन जागा रिक्त आहेत. राज्यसभा निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 45 प्रथम प्राधान्य मतांची आवश्यकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT