Pramod Mahajan, Lalkrishna Advani Sarkarnama
देश

Ayodhya Ram Temple : राम मंदिरासाठी जीवाचे रान केले; आता मात्र दुर्लक्षित, कोण आहेत 'ते' नेते ?

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी आणि लोकार्पणही

Sunil Balasaheb Dhumal

Ayodhya Ram Temple Consecration ceremony : अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी (२२ जानेवारी) रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान, 1980 च्या दशकात आरएसएस-भाजपच्या अजेंड्यामध्ये राम मंदिर आंदोलन हा एक मुद्दा आहे. तामिळनाडूतील एका गावात सामूहिक धर्मांतराच्या घटनेनंतर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात आले होते. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप, बजरंग दल आणि संबंधित संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलनाला एक शक्तिशाली सामाजिक-राजकीय मोहीम बनवण्यासाठी मोठी ताकद लावली. राम मंदिरासाठी भाजपसह इतर संघटनेतील अनेक नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी करून आता त्याचे लोकार्पण होत आहे. मात्र सध्या त्या नेत्यांकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

लालकृष्ण अडवाणी

अयोध्या रामजन्मभूमी मोहिमेने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना हिंदुत्वाचा खरा 'पोस्टर बॉय' बनवले. त्यांनी 1990 मध्ये गुजरातमधील सोमनाथ मंदिर ते अयोध्येतील रामजन्मभूमीपर्यंत देशव्यापी रथ यात्रा सुरू केली. यातून अडवाणींनी अयोध्येत राम मंदिरासाठी जनतेचा पाठिंबा मिळवला. ते दोन वर्षांनी बाबरी मशीद जागेजवळ पोहोचले. त्यानंतर बाबरी मशीद पाडण्यात आली. या प्रकरणी अडवाणी यांच्यावर अजूनही फौजदारी खटला सुरू आहे.

प्रमोद महाजन

प्रमोद महाजन वाजपेयी-अडवाणी यांच्या भाजपातील सर्वात मोठे रणनीतीकार मानले जात होते. अडवाणी सुरुवातीला सोमनाथ ते अयोध्या अशी पदयात्रा काढणार होते. मात्र महाजनांच्या सूचनेनुसार त्यांनी 1990 मध्ये रथयात्रा करण्याचा निर्णय घेतला. महाजनांनी दिलेल्या दोन तारखांपैकी अडवाणींनी रथ यात्रेचा शुभारंभ 25 सप्टेंबर रोजी केला. प्रमोद महाजन यांनीच त्यावेळी भाजपचे उदयोन्मुख संघटनात्मक नेते नरेंद्र मोदी यांच्या मदतीने रथयात्रेची आखणी आणि अंमलबजावणी केली होती.

अशोक सिंघल

अशोक सिंघल हे विश्व हिंदू परिषदेचे शक्तिशाली नेते होते. रामजन्मभूमी आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी आपली संपत्ती अर्पण केली होती. अनेकांसाठी ते राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख शिल्पकार होते. 2011 पर्यंत ते विहिंपचे प्रमुख होते. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला. तर नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांचे निधन झाले.

मुरली मनोहर जोशी

मुरली मनोहर जोशी हे 1980 आणि 1990 च्या दशकात भाजपचे प्राध्यापक म्हणून ओळखले जात होते. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडली, त्यावेळी मुरली मनोहर जोशी अडवाणींसोबत होते. याप्रकरणी त्याच्यावरही खटला सुरू आहे. बाबरी मशीद पडल्यानंतर उमा भारतींना मिठी मारताना जोशींच्या छायाचित्राने त्यावेळी देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

उमा भारती

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये भाजपच्या उपाध्यक्षा आणि मंत्री उमा भारती या राम मंदिर आंदोलनातील सर्वात प्रभावशाली नेत्या होत्या. बाबरी मशीद पाडण्याच्या भूमिकेबद्दल लिब्रहान आयोगाने त्यांच्यावर जमावाला चिथावणी दिल्याबद्दल दोषी ठरवले होते. राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी, हा पक्षाचा विशेष कार्यक्रम नाही. राम कोणत्याही एका पक्षाची मालमत्ता नसून, ते सर्वांचे आहेत, असे स्पष्टपणे सांगितले होते.

साध्वी ऋतंभरा

साध्वी ऋतंभरा या राममंदिर आंदोलनातील एक अनोख्या हिंदुत्ववादी नेत्या होत्या. अयोध्या रामजन्मभूमी मोहिमेतील महिला चेहरा म्हणून महिला नेत्यांमध्ये उमा भारती यांच्यानंतरच साध्वी ऋतंभरा यांचे नाव घेतले जाते. रथयात्रेदरम्यान त्यांनी केलेल्या भाषणांच्या ऑडिओ कॅसेटची चांगली विक्री झाली होती.

कल्याण सिंग

उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून कल्याण सिंह हे अयोध्या मोहिमेचे प्रादेशिक क्षत्रप होते. कल्याण सिंह 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मशिदीकडे मोर्चा काढणाऱ्या कारसेवकांविरुद्ध बळाचा वापर न करण्याच्या यूपी सरकारच्या निर्णयाचा त्यांनी बचाव केला. नंतर त्यांना भाजपच्या उच्च नेतृत्वाचा पाठिंबा मिळाला होता. यानंतर त्यांनी भाजपमध्ये बंडखोरी करून स्वतःचा पक्ष काढला. मात्र काही दिवसांनी त्यांनी घरवापसी केली. त्यावेळी त्यांना भाजपने राज्यपालपदाचे बक्षीस दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विनय कटियार

विनय कटियार हे बजरंग दलाचे ज्वलंत नेते होते. राम मंदिर आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी बजरंग दल 1984 मध्ये अस्तित्वात आले. कटियार हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. 1992 नंतर त्यांचा राजकीय दर्जा वाढला. ते भाजपचे सरचिटणीस झाले. राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. फैजाबाद (आता अयोध्या) येथून खासदार म्हणून ते तीनदा संसदेत गेले.

प्रवीण तोगडिया

प्रवीण तोगडिया राम मंदिर अभियान हे आणखी एक स्फोटक नेते होते. आक्रमक भाषणांच्या जोरावर त्यांनी आपली हिंदुत्वाची प्रतिमा उभी केली. अशोक सिंघल यांच्यानंतर त्यांनी विहिंपचा कार्यभार स्वीकारला. पण भाजपमधील अडवाणींचा प्रभाव कमी झाल्याने तोगडिया संघ परिवारातील बाजूला पडले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT