Lok Sabha Election Survey Sarkarnama
देश

Lok Sabha Election Survey : दिल्लीतील 7 लोकसभा जागांसाठी नवा सर्व्हे आला समोर, 'आप'चे टेन्शन वाढले

Chetan Zadpe

Delhi Lok Sabha Election Servay : कथित मद्य घोटाळ्यावरून दिल्लीत सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आता भारतीय जनता पक्ष (BJP) आणि आप यांच्यात राजकीय घमासान सुरू असताना दिल्लीतील लोकसभा जागांबाबत एक सर्वेक्षण समोर आले आहे.

दिल्लीतील लोकसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या या सर्वेक्षणात जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीत आप आणि काँग्रेसला 'क्लीन स्वीप' दिला आहे. अशा स्थितीत विधानसभेत भरभक्कम बहुमत असलेल्या आपल्या बालेकिल्ल्यात काँग्रेससोबत आघाडी केलेल्या 'आप'ला या वेळी आपले खाते उघडता येईल का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. (Latest Marathi News)

सर्वेक्षणाचा अंदाज काय?

शुक्रवारी (ता. 7 ऑक्टोबर) इंडिया टीव्ही-सीएनएक्सने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात 2014 आणि 2019 च्या लोकसभेप्रमाणेच 2024 मध्येही भाजप हा दिल्लीत आप आणि काँग्रेसचा धुव्वा उडवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप पुन्हा एकदा दिल्लीतील लोकसभेच्या सर्व 7 जागा जिंकू शकतो. या वेळीही काँग्रेस आणि आपला खाते उघडणे या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार कठीण दिसत आहे.

सर्वेक्षणानुसार, दिल्लीच्या सात लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक झाली तर भाजपला 52 टक्के मते मिळू शकतात. अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला 25 टक्के आणि काँग्रेसला 17 टक्के मते मिळू शकतात. 6 टक्के मते इतरांच्या खात्यात जातील असा अंदाज आहे. याचाच अर्थ असा की या सर्वेक्षणाच्या मतांच्या टक्केवारीत काँग्रेस आणि आपच्या एकूण मतांच्या तुलनेत भाजप खूप पुढे आहे.

याच संस्थेने जुलै 2023 मध्ये सर्वेक्षण केले तेव्हा भाजपला 5 जागा आणि 'इंडिया आघाडी'ला 2 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. आता तीन महिन्यांनंतर ऑक्टोबरच्या सर्वेक्षणात भाजप पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे दिसत आहे. आप आणि काँग्रेस यांच्यात युती झाली असली तरी दोन्ही पक्षांमधील संबंध फार सलोख्याचे दिसत नाहीत. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांविरोधात वक्तव्य करत आहेत.

विधानसभेत भक्कम बहुमत, लोकसभा निवडणुकीत निराशा

दिल्लीत मागील दशकात आम आदमी पक्षासाठी विधानसभा आणि लोकसभेत परस्परविरोधी निकाल लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला दोन वेळा अतिप्रचंड बहुमत मिळाले असले तरी लोकसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. या वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सहभागी होऊन भाजपला तगडे आव्हान देण्याची तयारी 'आप'ने केली आहे. या वेळी त्यांना कितपत यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT