Akhilesh Yadav Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : अखिलेश यांची मोठी घोषणा; ‘इंडिया’ला धक्का, आणखी एक पक्ष बाहेर

Akhilesh Yadav News : अखिलेश यादव यांची साथ यापूर्वी अनेक पक्षांनी सोडली आहे. आता केवळ समाजवादी पक्षाची काँग्रेससोबतच आघाडी उरली आहे.

Rajanand More

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात धक्का बसला आहे. आणखी एका पक्षाची समाजवादी पार्टीसोबत असलेली आघाडी तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीच आज ही घोषणा केली. त्यामुळे राज्यात इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. यापूर्वी जयंत चौधरींसह इतर काही नेत्यांनीही अखिलेश यांची साथ सोडली आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अपना दल (कमेरावादी) आणि सपामध्ये (Samajwadi Party) 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडी झाली होती, पण आता लोकसभेसाठी ही आघाडी नसल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे. अपना दलने कालच लोकसभेच्या तीन उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे सपा आणि या पक्षातील आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

सपानेही काल अपना दलने उमेदवारी जाहीर केलेल्या मिर्झापूर मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केली. त्यानंतर आज अखिलेश (Akhilesh Yadav) यांनी या पक्षासोबत आघाडी नसल्याचे स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून अपना दलच्या नेत्या पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांची सपावर नाराजी होती. राज्यसभा निवडणुकीवेळी त्यांच्या आईला तिकीट न दिल्याने त्यांनी उघडपणे अखिलेश यांना आव्हान दिले होते. अखेर दोन्ही पक्षांतील आघाडी तुटल्याचे आज स्पष्ट झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) अखिलेश यांना अनेक साथीदार सोडून गेले आहेत. राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची साथ सोडत एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांच्यासोबत जागावाटपही केले आहे. त्याआधी ओमप्रकाश राजभर यांनीही सपासोबतची आघाडी तोडली आहे. आता पल्लवी पटेलही सोबत नसल्याने इंडिया आघाडीला धक्का बसला आहे.

राज्यात सपा आणि काँग्रेसमधील (Congress) जागावाटप पूर्ण झाले आहे. काँग्रेसला 17 जागा सोडण्यात आल्या आहेत, तर उर्वरित 63 जागांवर सपा आणि मित्रपक्षाचे उमेदवार असतील. अद्याप दोन्ही पक्षांनी सर्व उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या जागावाटपामध्ये अपना दलला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी तीन मतदारसंघांत उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर अखिलेश यांनीच आज हा पक्ष आघाडीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT