Debangshu Bhattacharya, Abhijit Gangopadhyay Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : 'तृणमूल'ला जेरीस आणणारे माजी न्यायाधीश आता मतदारांच्या कोर्टात; भाजपकडून उमेदवारी

Rajanand More

West Bengal News : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपने तामलूक मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघातून भाजपने माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. न्यायाधीशपदी असताना त्यांनी बंगाल सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांना स्थगिती दिली होती. तसेच काही प्रकरणांच्या चौकशीचे आदेशही दिले होते. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडूनही त्यांच्यावर टीका केली जात होती.

गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay) यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांनी 2021 मध्ये ममता सरकारमधील कथित शिक्षक भरती घोटाळ्याची सीबीआयमार्फत (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या वेळी त्यांनी सरकारवर कठोर शब्दांत ताशेरेही ओढले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया स्थगित करावी लागली होती. त्यानंतर ही स्थगिती उठवण्यात आली होती.

गंगोपाध्याय यांना आता भाजपने तामलूक लोकसभा मतदारसंघातून उतरवल्याने टीएमसीकडूनही जोरदार प्रचार केला जाणार आहे. या मतदारसंघात टीएमसीने सोशल मीडिया (Social Media) टीमचे प्रमुख देवांशू भट्टाचार्य यांना उतरवले आहे. त्यामुळे 61 वर्षीय गंगोपाध्याय यांना एका युवा नेत्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. टीएमसीकडून गंगोपाध्याय यांच्या पराभवासाठी खूप प्रयत्न केले जाणार असल्याचे यापूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ममतांनी गंगोपाध्याय यांच्या भाजप प्रवेशानंतर सडकून टीका केली होती. बीजेपी बाबू असा त्यांचा उल्लेख करत ममता म्हणाल्या होत्या की, त्यांनी निवडणूक लढवली तर ते नक्कीच पराभूत होतील, याची खात्री बाळगा. हजारो विद्यार्थ्यांना नोकरी नाकारून माजी न्यायाधीश नेते बनले आहेत. त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली तरी तिथे विद्यार्थ्यांना पाठवू.

ममतांनी घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी तामलूकमधून 27 वर्षीय भट्टाचार्य यांना रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे. गंगोपाध्याय यांना याच मतदारसंघातून तिकीट मिळणार असल्याची कुणकुण त्यांना लागली होती. त्याप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांना हात घालत तरुण चेहऱ्याला संधी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही लढत भाजपसह तृणमूलनेही प्रतिष्ठेची केली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT