Mukesh Dalal, Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीत भाजपचा पहिला विजय; गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड...

Rajanand More

Gujarat News : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहाेचला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान चार दिवसांवर आलेले असतानाच भाजपसाठी मोठी खूष खबर आली आहे. गुजरातमधील एका उमेदवाराचा विजय निश्चित झाला असून, निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांना विजयाचे प्रमाणपत्रही देण्यात आले. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज उरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

गुजरातमधील (Gujarat) सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला देशातील पहिला विजय मिळाला आहे. या मतदारसंघातून भाजपचे (BJP) उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) यांचा बिनविरोध विजय झाला असून, ते भाजपचे पहिले खासदार ठरले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व आठ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपला देशातील पहिला विजय गुजरातमध्ये मिळाला आहे. चार जून आधीच भाजपच्या पारड्यात एक जागा पडली आहे.

सुरतमधील काँग्रेसचे (Congress) उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज कालच बाद करण्यात आला आहे. तीन सूचकांच्या सह्यांवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन सूचकांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण ते हजर न झाल्याने अर्ज बाद करण्यात आला आहे. काँग्रेसच्या डमी उमेदवाराचा अर्जही बाद करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या उमेदवारासह रिंगणात नऊ उमेदवार उरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. प्रमुख विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपनेही इतर छोटे पक्ष व अपक्षांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढणे सुरू केले होते. त्यामध्ये पक्षाला यश आले. आज बसपाच्या उमेदवाराने सगळ्यात शेवटी उमेदवारी अर्ज मागे घेत दलाल यांचा विजय सुकर केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दलाल यांना बिनविरोध निवडीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दलाल यांना खासदारकीचे प्रमाणपत्रही दिले आहे. गुजरातमध्ये भाजपमध्ये सर्व जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मागील निवडणुकीतही भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये पहिले यश निवडणुकीआधीच मिळाले आहे.

दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केल्याच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र, त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता कोर्टाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. पण त्याआधीच दलाल हे विजयी झाल्याने भाजपसाठी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने पहिला विजय मनोबल वाढवणारा ठरणार आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT