Mayawati Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : मायावतींचे काँग्रेसला थेट आव्हान; अमेठी, रायबरेलीबाबत मोठा निर्णय

Mayawati News : मायावतींनी मागील निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांत उमेदवार उतरवले नव्हते. मात्र, या निवडणुकीत त्या गांधींना धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

Rajanand More

Uttar Pradesh News : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) एकला चलोची भूमिका घेतली आहे. मागील निवडणुकीतही त्यांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. आता कोणत्याही पक्षासोबत न जाण्याचा निर्णय घेत त्यांनी काँग्रेससमोरही आव्हान उभे केले आहे. मागील निवडणुकीत त्यांनी रायबरेली आणि अमेठी या हायप्रोफाइल मतदारसंघात उमेदवार दिले नव्हते. या वेळी मात्र, त्यांनी थेट आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी (Sonia Gandhi) विजयी झाल्या होत्या, तर अमेठी मतदारसंघात स्मृती इराणींनी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पराभूत करत काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला काबीज केला. त्यावेळी बसपा (BSP) किंवा सपाने या मतदारसंघात उमेदवार दिले नव्हते. या निवडणुकीत सपा आणि बसपाची आघाडी झाली होती. पण त्यानंतरही भाजपला (BJP) 80 पैकी 64 जागांवर विजय मिळाला, तर आघाडीला केवळ 5 जागा मिळाल्या होत्या.

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) काँग्रेसला मागील निवडणुकीत रायबरेली ही एकमेव जागा मिळाली होती. आता हा गडही उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, त्यांना मायावतींचीही साथ मिळणार आहे. दोन्ही मतदारसंघांत बसपाचे उमेदवार निवडणूक लढणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बसपाच्या या घोषणेमुळे काँग्रेसचे टेन्शन काही प्रमाणात वाढले आहे. मात्र, तरीही समाजवादी पक्ष सोबत असल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही, अशी आशा काँग्रेसला आहे. सपाने काँग्रेसला 17 जागा सोडल्या आहेत. सपाची मदत दोन्ही मतदारसंघात थेट होणार असल्याने या निवडणुकीत अमेठी (Amethi) आणि रायबरेलीसह (Raebareli) आणखी काही जागा पदरात पडतील, असा दावा नेत्यांकडून केला जात आहे.

काँग्रेसकडून अद्याप अमेठी आणि रायबरेलीतून उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. राहुल गांधी पुन्हा अमेठीतून लढतील का, याबाबत साशंकता आहे. त्यांना आधीच केरळमधील वायनाडमधून उमेदवारी जाहीर कऱण्यात आली आहे, तर रायबरेलीतून प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्याने काँग्रेसकडून प्रियांका यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT