Election Commission Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : ‘या’ चार 'M' चे निवडणूक आयोगासमोर आव्हान; लक्ष्मण रेषा ओलांडली तर खबरदार...

Election Commission : लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोगाने संपूर्ण देशभरात 2 हजार 100 निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांची निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने नजर असेल.

Rajanand More

News Delhi News : देशात लोकसभा (Lok Sabha Election 2024) आणि चार राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता खऱ्याअर्थाने वातावरण तापणार आहे. आता निवडणूक आयोगालाही चार जूनपर्यंत सतर्क राहावे लागणार आहे. या काळात आयोगाला प्रामुख्याने चार आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही आज ही आव्हाने मान्य करत त्यावर करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट केले. कोणताही पक्ष, उमेदवार, स्टार प्रचारकांनी लक्ष्मण रेषा पार करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशाराही आयोगाने दिला आहे.

राजीव कुमार (Rajiv kumar) यांनी सांगितलेली चार आव्हाने म्हणजे चार ‘एम’ आहेत. पहिला एम म्हणजे मसल पॉवर, दुसरा मनी पॉवर, तिसरा मिस इन्फॉर्मेशन आणि चौथा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. त्यावर नियंत्रणासाठी देशभरात दोन हजार शंभर निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

याविषयी राजीव कुमार म्हणाले, मसल पॉवरवर नियंत्रण आणण्यासाठी आयोग सज्ज आहे. हिंसा होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जाईल. आवश्यकतेनुसार, ड्रोनचा वापर केला जाणार आहे. तीन वर्षे नियुक्ती असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सांगितले आहे. तात्पुरत्या किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वापर निवडणुकीतील (Election) कोणत्याही टप्प्यावर केला जाणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात एक कंट्रोल रूम असेल.

3 हजार 400 कोटी जप्त

मनी पॉवर म्हणजे काही राज्यांमध्ये निवडणुकीदरम्यान पैशांचा पाऊस पाडला जातो. मागील अकरा निवडणुकांमध्ये आयोगाने (Election Commission) 3 हजार 400 कोटी रुपये जप्त केले आहेत. काही राज्यांत पैशांचा वापर तर काही राज्यांमध्ये हिंसेचे प्रमाण अधिक असते, तर काही राज्यांमध्ये भौगोलिक अडचणी असतात. त्यानुसार प्रत्येक राज्यात यंत्रणा राबवली जाईल. पैशांचा चुकीचा वापर होऊ देणार नाही. मद्य, कुकर, साडी अशा मोफत वस्तूंचे वाटप करण्याच्या तक्रारी येतात, त्यावर नजर असेल. बँकाही संशयास्पद व्यवहारांची माहिती दररोज देणार आहेत. हेलिकॉप्टर, चार्टर विमान, रेल्वे, रस्त्यांवरही वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

सोशल मीडियासाठी सतर्क

तिसरा एम म्हणजे मिस इन्फॉर्मेशन. चुकीची माहिती आयोगासाठी मोठी आव्हानात्मक असते. सोशल मीडियाबाबतही (Social Media) आम्ही सतर्क आहोत. तथ्यांवर आधारित माहिती नसेल, अफवा असतील तर त्या रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्यांतील संबंधित यंत्रणांना अशा सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्याचे, कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

आचारसंहितेचे उल्लंघन

आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन होऊ नये, यासाठी राजकीय पक्षांना सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने मागील पाच वर्षांत झालेल्या आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत सर्व पक्षांना माहिती दिली आहे. जे स्टार कँपेनर असतील, त्यांना वैयक्तिक माहिती देण्याबाबत सर्व पक्षांना सांगण्यात आले आहे. प्रचारादरम्यान धार्मिक भाषणे, मिस लिडिंग जाहिराती, वैयक्तिक टीका, अयोग्य भाषेचा वापर होऊ नये, यासाठी बंधने असतील. रेडलाइन ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. प्रेमाने प्रचार करावा, द्वेषपूर्ण भाषणे नकोत, असे आवाहन राजीव कुमार यांनी केले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT