Mamata Banerjee, MP Mimi Chakraborty Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : ममतांना झटका; मिमी चक्रवर्तींचा खासदारकीचा राजीनामा

Rajanand More

West Bengal : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. निवडणुकीआधीच त्यांना विद्यमान खासदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. खासदार मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी त्यांनी बुधवारी विविध स्थानिक समित्यांसह संसदेतील समित्यांचाही राजीनामा दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

जादवपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्रीही आहेत. त्यांनी आपला राजीनामा तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडे सुपूर्त केला आहे, पण अद्याप त्यांनी राजीनामा स्वीकारलेला नाही.

स्थानिक पक्ष नेतृत्वासोबत असलेल्या वादातून चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. तसे त्यांनीही स्पष्ट केले आहे. या वादावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे आश्वासन दिल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले. जादवपूरसाठी माझी अनेक स्वप्नं आहेत, पण त्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चित्रपट क्षेत्रातून आलेल्या लोकांची प्रतिमा मलिन करणे खूप सोपे असते. संबंधित व्यक्ती काम करत नसल्याचे सांगितले जाते, अशी नाराती मिमी यांनी व्यक्त केली.     

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिमी चक्रवर्ती या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जादवपूर मतदारसंघातून विजय झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे नेते अनुपम हाजरा आणि कम्युनिस्ट पक्षाचे विकास रंजन भट्टाचार्य यांचा पराभव केला होता. त्यांचा विजय तृणमूल काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात होता. आता त्यांनीच राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सध्या तृणमूलच्या दुसऱ्या खासदार नुसरत जहाँ वादात अडकल्या आहेत. त्याही प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने त्यात मिमी यांच्या राजीनाम्याची भर पडली आहे. संदेशखली येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर महिलांचा लैंगिक छळ केल्याचे आरोप होत आहेत. त्यावर नुसरत यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही.

उलट नुसरत यांनी व्हॅलेंटाइन डे साजरा करताना अभिनेता यश दासगुप्ता यांच्यासोबत फोटोशूट केले होते. त्यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे तृणमूलचे नेते महिलांचा छळ करत असताना या पक्षाच्या खासदार फोटोशूटमध्ये व्यस्त असल्याची टीका भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT