New Delhi : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी रायबरेली या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी रायबरेलीतील मतदारांसाठी भावनिक पत्र लिहित लोकसभा निवडणूक न लढण्यामागचे कारण सांगितलं आहे. तसेच त्यांनी काही सुचक संकेतही दिले आहेत. (Lok Sabha Election 2024)
सोनिया गांधी (Sonia Gandhi) लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याने आता तिथून उमेदवार कोण, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे. वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे आपण निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. अतिशय भावनिक पत्रात त्यांनी सासरे फिरोज गांधी, सासू इंदिरा गांधी आणि पती राजीव गांधी यांचीही आठवण काढली. (Congress Latest News)
पत्राचा शेवट करताना सोनिया गांधींनी म्हटले आहे की, या निर्णयानंतर मला तुमची थेट सेवा करण्याची संधी मिळणार नाही, पण माझे मन आणि आत्मा सदैव तुमच्या पाठीशी राहील, तुम्हीसुद्धा मला आणि माझ्या कुटुंबाला प्रत्येक अडचणीत सांभाळून घ्याल, जसे आजपर्यंत सांभाळले, लवकरच भेटण्याचे वचन देत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.
रायबरेलीतून प्रियांका गांधींना (Priyanka Gandhi) उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनियांनीही त्यांच्या पत्रात आपल्या कुटुंबाला यापुढेही सांभाळण्याचे आवाहन रायबरेलीकरांना केले आहे. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची जोरदार चर्चा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोनिया गांधींनी काय लिहिलंय पत्रात?
माझे कुटुंब दिल्लीत अपूर्ण आहे. ते रायबरेलीमध्ये तुम्हाला भेटून पूर्ण होते. हे नाते खूप जुने असून, माझ्या सासरकडून सौभाग्याने मिळाले आहे. रायबरेलीशी आमच्या कुटुंबाचे संबंध खूप मजबूत आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझे सासरे फिरोज गांधी यांना येथून विजयी करून दिल्लीला पाठवले. त्यांच्यानंतर तुम्ही माझ्या सासू इंदिरा गांधी यांना आपलेसे केले. तेव्हापासून आजतागायत ही मालिका आयुष्यातील चढ-उतार आणि खडतर वाटेवरून प्रेमाने आणि उत्साहाने सुरू राहिली आहे आणि आमचा त्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
याच मार्गाने पुढे येण्याची जागा तुम्ही मलाही दिलीत. माझी सासू आणि माझ्या जीवनसाथीला कायमचे गमावल्यानंतर मी तुमच्याकडे आले आणि तुम्ही तुमचा पदर माझ्यासाठी पसरला. मागच्या दोन निवडणुकांत डोंगराप्रमाणे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात, हे मी कधीच विसरू शकत नाही. मला सांगायला अभिमान वाटतो की, आज मी जी काही आहे, ते तुमच्यामुळेच. या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी सतत प्रयत्न केला.
आता प्रकृती आणि वाढत्या वयामुळे मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही. या निर्णयानंतर मला तुमची थेट सेवा करण्याची संधी मिळणार नाही, पण माझे मन आणि आत्मा सदैव तुमच्या पाठीशी राहील हे नक्की. मला माहीत आहे की, तुम्हीसुद्धा मला आणि माझ्या कुटुंबाला प्रत्येक अडचणीत सांभाळून घ्याल, जसे आजपर्यंत सांभाळले. लवकरच भेटण्याचे वचन, असे भावनिक आवाहनही सोनिया गांधींनी केले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.