Lok Sabha Election 2024  Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसमध्ये 'हा' राजकीय पक्ष होणार विलीन? पक्षप्रमुखाला हवंय काँग्रेसचं तिकीट?

Chetan Zadpe

Uttar Pradesh News : माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीपासून वेगळे होऊन राष्ट्रीय शोषित समाज पक्षाची स्थापना करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा आहे. स्वामी प्रसाद मौर्य इंडिया आघाडीसोबत राजकीय संधान बांधू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. (Lok Sabha Election 2024)

स्वामी प्रसाद मौर्य यांची काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा स्थापन केलेला पक्ष ते काँग्रेस पक्षात विलीन करु शकतात. स्वामी प्रसाद मौर्य कुशीनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्याचीही शक्यता आहे. काँग्रेस कुशीनगरमधून स्वामी प्रसाद यांना उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. मात्र याला अधिकृत दुजोरा दोन्ही बाजूंनी अद्याप तरी आला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी गेल्या रविवारी लखनौमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांची भेट घेतली होती. यादरम्यान लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी स्वत: सोशल मीडियावरून दिली होती. औपचारिक बैठकीत इंडिया आघाडीच्या विस्ताराबाबत दोघांनी सकारात्मक चर्चा केल्याचे, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस एक जागा देऊ शकते -

स्वामी प्रसाद मौर्य इंडिया (INDIA) आघाडीत सामील झाल्यास जागावाटपाबाबत अडचण निर्माण होऊ शकते, असे मानले जात आहे. जर समाजवादी पार्टी स्वामी प्रसाद मौर्य यांना एकही जागा दिली नाही तर काँग्रेस त्यांच्या वाट्याला एक जागा देऊ शकते,अशी शक्यता आहे.

पडरौना विधानसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा आमदार राहिले आहेत -

स्वामी 1996 मध्ये आमदार म्हणून पहिल्यांदा उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) राज्याच्या विधानसभेत पोहोचले. स्वामी प्रसाद मौर्य हे कुशीनगर जिल्ह्यातील पडरौना विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांनी 2009 मध्ये कुशीनगरमधून बहुजन समाज पार्टीच्या (BSP) तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत स्वामी प्रसाद मौर्य यांचा काँग्रेस उमेदवार आर.पी. एन. सिंह यांच्याकडून पराभव झाला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT