BJP, Congress Sarkarnama
देश

Lok Sabha Election News : सुरतमध्ये काँग्रेसला झटका; भाजपच्या तक्रारीनंतर उमेदवाराचा अर्ज बाद, सुचकांवरून रंगले नाट्य

Congress News : उमेदवाराच्या शपथपत्रावर सह्या असलेल्या तीन सुचकांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचा दावा केला जात आहे.

Rajanand More

Surat News : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election News) पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अशावेळी काँगेसला गुजरातमध्ये झटका बसला आहे. सुरतमधील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. त्यांच्या शपथपत्रावर असलेल्या तीन सुचकांच्या सह्यांवर भाजपने आक्षेप घेत तक्रार केली होती. त्याची पडताळणी करताना हे तिघेही सुचक उपस्थित न राहिल्याने काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.

सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून (Congress) निलेश कुंभानी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपचे (BJP) उमेदवार दिनेश जोधानी यांनी सुचकांबाबत तक्रार केली होती. तीन सुचकांना अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्तित राहण्यास सांगितले होते. पण ते हजर झाले नाहीत.

याविषयी बोलताना काँग्रेसचे नेते बाबू मांगुकीया म्हणाले, आमच्या तीन सुचकांचे अपहरण झाले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या सह्यांऐवजी अपहरणाची चौकशी करायला हवी. सह्यांची खातरजमा केल्याशिवाय अर्ज रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही अपहरणाची तक्रार देऊनही पोलिसांनी त्यावर कार्यवाही केली नाही, असा आरोपही मांगुकीया यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुंभानी यांच्या शपथपत्रावर त्यांच्या भाचा, एक भागीदार आणि बहिणीच्या पतीच्या सह्या होत्या. तेच पडताळणीसाठी हजर न झाल्याने काँग्रेसमधूनच आता कुंभानी यांच्याविरोधात आवाज उठू लागला आहे. पक्षाचे नेते अस्लम सायकलवाला यांनी कुंभानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. भाजपसोबत त्यांनी सौदा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तीन सुचकांनीही कालच निवडणूक अधिकाऱ्यांना एक कागद सोपवून कुंभानी यांच्या अर्जावर आपल्या सह्या नसल्याचे म्हटले आहे. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. त्यानंतरच निवडणूक अधिकाऱ्यांनी कुंभानी यांना उत्तर देण्यासाठी एक दिवसाची वेळ दिली होती. ते उत्तरासाठी कार्यालयात आले होते. पण तिघे सुचक नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, सुरत मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असून 1989 पासून या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होत आहे. माजी पंतप्रधान मोरारसी देसाई हे या मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसची फारशी ताकद नसल्याने ही लढत प्रत्येकवेळी एकतर्फी होत असल्याचे चित्र आहे. आता उमेदवाराचा अर्जच बाद झाल्याने भाजपचा रस्ता मोकळा झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT