New Delhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल्या पहिल्यावहिला भाषणावरून सोमवारी मोठा गदारोळ झाला. हिंदू समाजाविषयी केलेले विधान, सभागृहात दाखवण्यात आलेले फोटो, अध्यक्षांकडे पाठ करून बोलणे अशा विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला होता.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांच्या भाषणादरम्यान दोनदा उभे राहून त्यावर भाष्य केले होते. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांच्या भाषणातील काही भाग लोकसभेच्या कामकाजातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राहुल यांनीही त्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कामकाजात भाषण पूर्ववत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
आपल्या भाषणातील काही भाग वगळल्याचे समजल्यानंतर धक्का बसल्याचे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. अध्यक्षांना सभागृहाच्या कामकाजातून काही विधान काढून टाकण्याचा अधिकार आहे. पण केवळ लोकसभा नियम 380 मध्ये दिलेले शब्द हटवता येऊ शकतात, असे राहुल यांनी पत्रात नमूद केले आहे.
माझ्या भाषणातून खूप मोठा महत्वाचा भाग काढून काढण्यात आल्याचे पाहून मी स्तब्ध झालो आहे. मी 2 जुलै 2019 ला लोकसभेतील चर्चेदरम्यानचा काही भाग जोडत आहे. त्याला कामकाजातून हटवण्यात आलेले नाही. माझ्या भाषणातून हटवण्यात आलेला भाग नियम 380 अंतर्गत येत नाही. मी जे बोललो ते जमिनीवरील सत्य असल्याचा संदेश मी देऊ इच्छित होतो, असेही राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.
राहुल यांनी भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या भाषणातून केवळ एक शब्द हटवण्यात आल्याबाबतही आक्षेप घेतला आहे. दरम्यान, राहुल यांच्या भाषणातील काही भाग हटवण्यात आल्यानंतर विरोधकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत संसदेत राहुल गांधी यांच्यासारखे वागू नका, असा सल्ला खासदारांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.