Chennai : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मैत्रीण आणि AIADMK तून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्या व्ही. के. शशिकला यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. AIADMK च्या नेत्यांच्या मनात अजूनही त्यांची भीती असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
AIADMK ने सोमवारी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना शशिकला यांना न भेटण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे. तसेच पक्षाचे प्रवक्ते व्ही. पुगझेन्दी यांच्यासह 17 जणांची हकालपट्टी केली आहे. हे सर्व जण शशिकला यांना भेटल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पक्षाच्या संसदीय दलाची बैठक सोमवार चेन्नईत झाली. यामध्ये शशिकला यांच्याविषयी ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रममाणे पक्षाचे समन्वयक ओ. पनीरसेल्वम यांची विधिमंडळातील पक्षाचे उपनेते म्हणूनही निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांची विरोधी पक्षनेते म्हणून काही दिवसांपूर्वीच निवड झाली आहे.
शशिकला आणि पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या संवादातील फोन रेकॉर्ड सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पक्षाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. पुढील काळात आपण पक्षात परतणार असल्याचे विधान शशिकला यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीआधीच शशिकला यांनी राजकारणातून दूर जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण आता पुन्हा एकदा त्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
पक्षाने पारित केलेल्या ठरावामध्येही हे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. मुख्य विरोधी पक्षाकडे 66 आमदार असून त्यातील काही सदस्यांशी शशिकला संपर्क साधत आहेत. त्यामाध्यमातून त्या पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे ठरावात म्हटले आहे.
पक्षाने केलेल्या या ठरावामुळे शशिकला तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा सक्रीय झाल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची वाताहात झाली. एकही जागा पक्षाला जिंकता आली नाही. त्यानंतर काही दिवसांतच शशिकला यांनी पुन्हा पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सूरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
शशिकला या जयललिता यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी होत्या. पक्षाच्या सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले आहे. त्यामुळे अजूनही त्यांना मानणारा गट पक्षात सक्रीय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतील राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.