New Delhi : लोकसभेत आम आदमी पक्षावर भाजपसह इंडिया आघाडीतील पक्षही तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत एका इमारतीच्या तळमजल्यात नाल्याचे पाणी घुसून यूपीएससीच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचे पडसाद सोमवारी लोकसभेतही उमटले.
भाजपच्या खासदार बांसूरी स्वराज यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी आपवर सडकडून टीका केली. मागील दहा वर्षांपासून हा पक्ष दिल्लीत सत्तेत आहे. महापालिकेतही दोन वर्षांपासून सत्ता उपभोगत असताना कोणतीही कामे केलेली नाही. त्यामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू दिल्ली सरकारच्या दुर्लक्षामुळे झाला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी स्वराज यांनी केली.
तीन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी बिहार, एक केरळ आणि एक तेलंगणातील आहे. त्यामुळे केरळमधील काँग्रेसचे खासदार शशी थरूर हेही लोकसभेत चांगलेच संतापलेले दिसले. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्व घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
केवळ भरपाई देऊन उपयोग नाही. अनेक गंभीर मुद्दे आहेत. अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसते. महापालिका यासाठी जबाबदार आहे. अशाप्रकारच्या चुकीच्या गोष्टी रोखायला हव्या, असेही शरूर म्हणाले. थरूर यांच्यानंतर बिहारमधील खासदार पप्पू यादव यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. ही खूप दुर्देवी घटना आहे. एनओसी देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. उत्तर प्रदेशात जिथे बेकायदेशीर इमारत आहे, तिथे बुलडोझर चालवला जातो. हे सरकार दिल्लीत अशा बेकायदेशीर इमारतींवर बुलडोझर चालवणार का, असा सवाल अखिलेश यांनी केला.
दरम्यान, दिल्ली महापालिकेने तळमजल्यात बेकायदेशीरपणे क्लास चालवणाऱ्या क्लासचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. जवळपास 15 क्लासला नोटीस बजावण्यात आली असून बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात येणार आहे. मृत्यू झालेले तीन विद्यार्थी राव क्लासेसच्या इमारतीतली तळमजल्यात असलेल्या ग्रंथालयात होते. तिथेच पाणी घुसून दुर्घटना घडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.