Lok Sabha Clash : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बुधवारी विरोधकांवर लोकसभेत चांगल्याच भडकल्याचे पाहायला मिळाले. वित्त विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. प्रामुख्याने काँग्रेससह तमिळनाडूतील द्रमुक आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारच्या धोरणांवरही हल्ला चढविला.
वित्त विधेयकाला उत्तर देताना अर्थमंत्र्यांचा संताप चांगलाच वाढला होता. अर्थसंकल्पातून तरतुदींवरून विरोधकांनी टीकेचा सूर लावला होता. आज निर्मला सीतारमण यांनी प्रत्येक मुद्दा खोडून काढताना विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून विरोधी बाकांवरील सदस्यांचाही पारा चढला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सीतारमण यांच्या विधानावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर सीतारमण यांनी त्यांचे नाव घेत टोलेबाजी केली. सुप्रिया सुळेंना उद्देशून त्या म्हणाल्या, सुप्रिया सुळेंचं मी कौतुक करते. आज त्या इथे आघाडीतील सहकाऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आहेत. पण मुंबईत कुस्ती आणि इथे दोस्ती आहे.
सुप्रिया सुळे यांच्या शेजारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत हेही उपस्थित होते. तेही उभे राहून सीतारमण यांच्या टीकेला उत्तर देताना दिसत होते. याचअनुषंगाने सीतारमण यांनी ‘मुंबईत कुस्ती आणि इथे दोस्ती’ असे विधान केल्याचे दिसते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी आम्ही ती एनसीपी नसल्याचे सांगत महाराष्ट्रातही दोस्तच असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. त्यावर तुम्ही काँग्रेसविरोधात लढला नाही का, असा सवाल केला. त्यानंतर सीतारमण यांनी आपले वित्त विधेयकावरील भाषण पुन्हा सुरू केले.
दरम्यान, सीतारमण यांनी आपल्या उत्तरामध्ये द्रमुक सरकारवर महिलाविरोधी असल्याचा आरोप केला. त्यांना महिलांचा पाठिंबा मिळणार नाही, असेही म्हटले. त्यावरूनच वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या विधानावर विरोधी पक्षातील सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर सीतारमण विरोधकांवर भडकल्या होत्या. मी जेव्हा उत्तर देते, तेव्हा द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य सभागृहात हजर नसतात. तुम्ही टीका करता मग त्यावर उत्तर ऐकण्याचीही तयारी ठेवा, असा पलटवार सीतारमण यांनी लोकसभेत केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.