Upendra Kushwaha  Sarkarnama
देश

NDA Political News: 'आपका स्वागत है, आभारी हैं, लेकीन व्हाेट नही मिलेगा महाराज...!'

Loksabha Election 2024 : बिहारमधील काराकाट मतदारसंघातील एका गावात गेलेले एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाहा यांचा स्थानिक नेत्याने अत्यंत सभ्य भाषेत पाणउतारा केला. १८ वर्षांत गावात यायला आपल्याला वेळ मिळाला नाही, आता आलात तर...

अय्यूब कादरी

Political News : लोकशाहीत मतदार हा राजा समजला जातो. निवडणूक आली की मतदारांना राजासारखे वलय प्राप्त होते. उंची कपडे घातलेले, आलिशान गाड्यांमधून आलेले नेतेही या मतदारराजासमोर नतमस्तक होत असतात. मतदारही या काळात नेत्यांना हिसका दाखवण्याची संधी सोडत नाहीत. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्थानिक नेता लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला सभ्य भाषेत सुनावताना दिसत आहे, त्यामुळे त्याच्यामागे थांबलेले लोक सुखावलेले दिसत आहेत.

कुठेही जरा खट्ट झाले, एखादी अप्रिय घटना घडली की लोक म्हणतात महाराष्ट्राचा बिहार झाला. राजकीय नेतेही एकमेकांवर आरोप करताना त्यांना महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे किंवा त्यांनी महाराष्ट्राचा बिहार करून टाकला आहे, असे बोलत असतात. अन्य राज्यांत बिहारची प्रचंड अशी नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे.

प्रत्यक्षात, बिहारचे लोक अत्यंत मायाळू आहेत. गुंडगिरी वगैरे तर सर्वच ठिकाणी असते. आमच्याकडे गुंडगिरी असते, मात्र धावत्या वाहनांमध्ये महिलांवर अत्याचार होत नाहीत, असे बिहारचे लोक बोलत असतात. अन्य राज्यांत बिहारची प्रतिमा वाईट आहे, याचे बिहारवासीयांना शल्य असते. बाहेरच्या राज्यांतील व्यक्तींशी अत्यंत सौहार्दाने वागून ती प्रतिमा पुसण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बिहारमध्ये जाऊन आलेल्या बहुतांश जणांना हा अनुभव नक्कीच आलेला असणार.(Loksabha Election 2024)

तर मूळ मुद्दा असा की, व्हायरल झालेला हा व्हिडिओ बिहारमधील आहे. राष्ट्रीय लोक मोर्चाचे उपेंद्र कुशवाहा यांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले. उपेंद्र कुशवाहा हे काराकाट लोकसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार आहेत. मतदारसंघातील एका गावातील स्थानिक नेत्याच्या घरी ते गेले आहेत. त्यावेळी हा प्रसंग उद्भवला. स्थानिक नेत्याने सभ्य भाषेत कुशवाहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. बिहारवासीयांची हिंदी पुन्हा पुन्हा एेकावी अशी असते.

अशाच भाषेत या स्थानिक नेत्याने कुशवाहा यांचा चांगलाच पाणउतारा केला. कुशवाहा यांच्यासोबत असलेले नेते त्यामुळे स्तब्ध झाले, हतबल झाल्याचेही दिसून आले. गावातील नागरिकांनीही स्थानिक नेत्याच्या सुरात सूर मिसळला.

आहे, ''अबकी तो आपको व्हाेट नही देंगे महाराज, लेकीन आपका स्वागत है. आभार भी व्यक्त कर रहे हैं की आजतक 18 वर्षों से जो सांसद महोदय (खासदार महोदय) रहे हैं, एेसे एेसे पिछडा गांव मे आना उचित नही समझे. यहां तक की इधर से गुजरते हुए कभी रुकने का भी प्रयास नही किए लेकीन आपको बुलाया गया है तो चलिए हमलोग धन्य हो गये आपका दर्शन करके महाप्रभुजी, लेकीन व्हाेट आपको नही मिलेगा.'' यावर जमलेल्या लोकांतील एकजण आक्षेप घेत स्थानिक नेत्याला म्हणतो की, तुम्ही सर्वांचा ठेका घेतला आहे का? यावर लोक पुन्हा म्हणतात, ठेका तर नाही घेतला, मात्र या वेळी यांना मत देणार नाही. उपेंद्र कुशवाहा हे सर्व शांतपणे ऐकून घेतात आणि नंतर तेथून काढता पाय घेतात.

काराकट लोकसभा मतदारसंघात उपेंद्र कुशवाहा यांची लढत महाआघाडीतील सीपीआयचे (एमएल) के. राजाराम सिंह यांच्याशी होत आहे. मात्र भोजपुरी स्टार पवन सिंह यांनी या मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कुशवाहा यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. कुशवाहा समाजाची संख्या अधिक असलेल्या गावांतूनही उपेंद्र कुशवाहा यांना रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याच समाजाचे लोक आम्ही आपल्याला मत देणार नाही, असे त्यांच्या तोंडावरच सांगू लागले आहेत. त्यामुळे उपेंद्र कुशवाहा यांची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पवन सिंह यांना भाजपने (BJP) आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली होती. त्यावेळेसपासून पवन सिंह चर्चेत आले आहेत. पवन सिंह यांच्यामुळे काराकाट मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

या मतदारसंघात कुशवाहा समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळेच गेल्या तीन निवडणुकांत येथून महाबली सिंह कुशवाहा आणि उपेंद्र कुशवाहा (Upendra Kushwaha) हे विजयी झाले आहेत. आता पवन सिंह यांच्या एन्ट्रीमुळे लढत रंगतदार होणार आहे. पवन सिंह हे लोकप्रिय भोजपुरी अभिनेते आहेत. विशेषतः तरुणांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत. ते राजपूत समाजाचे आहेत. या मतदारसंघात राजपूत समाजाची मते मोठ्या संख्येने आहेत. पवन सिंह यांच्यामुळे कुशवाहा मतांमध्येही विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाआघाडीला येथून अद्याप विजय मिळालेला नाही. पवन सिंह यांच्या प्रंचंड लोकप्रियतेचा फटका उपेंद्र कुशवाहा यांना बसू शकतो, अशी चर्चा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT