Loksabha Election 2024 Survey Sarkarnama
देश

Loksabha Election 2024 : मोठी बातमी : भाजपच्या 'मिशन 45'ला सुरुंग; निवडणूकपूर्व सर्वेक्षणात महायुतीला महाधक्का

India Today Survery : इंडिया टुडे आणि सी- व्हाेटरच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात भाजप पिछाडीवर

Avinash Chandane

Maharashtra Politics :

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 'फिर एक मोदी सरकार' की, चित्र पालटेल याची उत्कंठा देशाला आणि संपूर्ण जगाला लागलेली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने देशात प्रचाराचा धुरळा उडवून द्यायला सुरुवात केली आहे. भाजपप्रणित एनडीएकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, तर भाजपविरोधी 'इंडिया' आघाडीचीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. असे असतानाच इंडिया टुडे आणि सी-व्हाेटरच्या सर्वेक्षणाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

महाराष्ट्रात भाजप (BJP) आणि महायुतीने 'मिशन 45'चं लक्ष्य ठेवले आहे. त्या दृष्टीने भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shivsena) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात जागावाटपाची बोलणी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी-व्हाेटरच्या सर्वेक्षणात (India Today and C Voter Survey) महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) बाजी मारणार असल्याचा निष्कर्ष आहे. महाविकास आघाडीला 48 पैकी 26 जागांवर विजय मिळणार असल्याचा सर्वेक्षणाचा अंदाज आहे, तर भाजपसह महायुतीचे लक्ष्य 45 जागांचे असले तरी केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

भाजपप्रणित महायुतीचा हा जबर धक्का देणारे सर्वेक्षण आहे. इंडिया टुडे आणि सी-व्हाेटरच्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीकडे मतांची टक्केवारी जास्त असणार आहे. महायुतीच्या पारड्यात 40.5 टक्के मते असतील, तर महाविकास आघाडीला 44.5 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीत घट हा भाजपसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी संसदेत भाजपप्रणित एनडीएला 400+ जागा मिळतील, तर एकट्या भाजपला 370+ जागा मिळतील असा दावा केला होता. त्यानंतर लगेचच सर्वेक्षणाचा निष्कर्ष आल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी दोन किंवा तीन महिन्यांत निवडणूक (Loksabha Election) अपेक्षित आहे. आणि पुन्हा आम्हीच सत्तेवर येऊ, असा दावा भाजपकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे आकडे भाजपची चिंता वाढवणारे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत भाजपसह एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तरीही महायुती बॅकफूटवर जाणार असल्याचा अंदाज आहे, तर महायुतीत काँग्रेसला 12 जागांवर विजय मिळेल, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे 14 असे एकूण 26 उमेदवार विजयी होतील, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची बाजी

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 72 जागा, हरयाणातील 10 पैकी 8 जागा आणि मध्य प्रदेशातील 29 पैकी 27 जागांवर भाजपचा विजय होईल, असेही सर्वेक्षणाच्या निष्कर्षात आहे. या शिवाय उत्तराखंड (5) आणि हिमाचल प्रदेशमधील (4) सर्व जागांवर भाजपप्रणित एनडीएला यश मिळेल. तसेच छत्तीसगडमधील 11 पैकी 10 जागांवरही भाजपचा विजय होणार असल्याचा अंदाज आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT