Congress News Sarkarnama
देश

Loksabha Election : चाललंय तरी काय...! काँग्रेसचा 'हा' बडा नेताच म्हणाला, २०२४ ला भाजपचीच हवा'!

Anand Surwase

Political News : देशात नुकत्यात चार मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास आणखीन दुणावला असून काँग्रेसवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना आणखीन कंबर कसून काम करावे लागणार आहे. परंतु सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांनी देखील 2024 मध्ये भाजपचीच हवा असल्याचे मत व्यक्त केले आहे. तीन राज्यातील काँग्रेसचा पराभव हा चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदम्बरम यांनी भाजपच्या निवडणूक रणनीतीचेही कौतुक केले.

पी. चिंदबरम म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचा झालेला पराभव हा चितेंत भर वाढवणारा असून 2024 मध्ये देखील भाजपचीच हवा असल्याचे दिसत आहे. यासाठी भाजपच्या निवडणूक रणनीतीचे कौतुक करायला पाहिजे. भाजपचे संघटन कौशल्य कौतुकास्पद असून ते कोणतीही निवडणूक शेवटची निवडणूक समजूनच लढवतात. त्यामुळेच त्यांना यश प्राप्त होत असल्याचे मतही चिंदम्बरम यांनी व्यक्त केले. त्यासोबतच विरोधी पक्षांनी या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत चिंदम्बरम यांनी इंडिया आघाडीचेही कान टोचले आहेत.

तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळाले असले तरी उत्तरेतील तीन राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यावर मत व्यक्त करताना पी. चिंदम्बरम म्हणाले की, तीन राज्यातील विजयाने भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेससाठी ही चिंतेचे बाब आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते या गोष्टींकडे गांभीर्याने पाहतील.

याशिवाय या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 40 टक्के मतदान झाले आहे, याचाच अर्थ काँग्रेसचा मतदार अद्यापही काँग्रेससोबत जोडलेला आहे. मात्र, ज्या पद्धतीने भाजपकडून प्रचाराची रणनीती अवलंबली जात आहे, ते पाहता नवीन मतदारांना आकर्षित करण्यात भाजप यशस्वी ठरत असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

विरोधी पक्षांनी आपली रणनीती बदलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत चिंदम्बरम पुढे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 45 टक्के मतदान मिळू शकते. त्यासाठी आत्तापासून सुरूवात करावी लागेल. बूथ मॅनेजमेंट करावे लागेल. मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी आणून मतदान करण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. याशिवाय सध्या जातीय जनगणना हा मुद्दा चर्चेत आहे. या शिवाय वाढती बेरोजगारी, गरिबी या मुद्यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचेही मत चिंदम्बरम यांनी व्यक्त केले.

SCROLL FOR NEXT