New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात ईव्हीएम मशीनवरून वादळ उठले आहे. महाविकास आघाडीतील बहुतेक नेते ईव्हीएमविरोधात भाष्य करत असून आपल्याला निकाल मान्य नसल्याचे सांगत आहेत. काँग्रेसने तर देशभरात ईव्हीएमविरोधात यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याआधी काँग्रेसने शुक्रवारी महत्वाचे काम केले आहे.
काँग्रेसने शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या मुद्द्यावर स्वतंत्रपणे सुनावणीची मागणी काँग्रेसने केली आहे. मतदार यादीतून मनमानी पध्दतीने मतदारांना हटवण्यात आले, अनेक मतदारसंघात 10 हजारांहून अधिक नवे मतदार समाविष्ट करण्यात आल्याचेही पक्षाने म्हटले आहे.
मतदारांच्या डेटावर माजी निवडणूक आयुक्तांनीही प्रश्न उपस्थित केल्याचा मुद्दा काँग्रेसने मांडला आहे. काँग्रेसने पत्रात म्हटले आहे की, मतदारांना मनमानी पध्दतीने मतदारयादीतून हटवणे आणि समाविष्ट करण्याची प्रक्रियेमुळे जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्रात जवळपास 47 लाख नवे मतदार समाविष्ट झाले आहेत.
ज्या 50 विधानसभा मतदारसंघात सरासरी 50 हजारांहून अधिक नवे मतदार समाविष्ट झाले, त्यापैकी 47 मतदारसंघात सत्ताधारी पक्ष आणि मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आल्याचा दावाही काँग्रेसने पत्रात केला आहे. आयोगाने प्रसिध्द केलेल्या आकड्यांवरही काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. सायंकाळी पाच ते सहा दरम्यान केवळ एका तासांत 76 लाख मतदान कसे झाले, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच काँग्रेससह इतर सर्वच विरोधी पक्षांनी ईव्हीएमकडे बोट दाखवले आहे. अनेक मतदारसंघात ईव्हीएम मशीन आधीपासूनच सेट होत्या, असा आरोप केला जात आहे. कमी मतदान असूनही त्यापेक्षा अधिक मते मिळणे, अनेक उमेदवारांना जवळपास सारखेच मतदान, काही मतदान केंद्रांवर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनाही शुन्य मतदान अशा अनेक तक्रारी विरोधकांकडून केल्या जात आहेत.
हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीनंतरही काँग्रेसने मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेवर अनेक आक्षेप घेत आयोगाला पत्र लिहिले होते. आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला वेळ देत म्हणणेही ऐकून घेतले होते. पण नंतर सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत करण्यात आलेल्या तक्रारींवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.