Mahua Moitra Sarkarnama
देश

Mahua Moitra news : महुआ मोइत्रांनी PM मोदींचं नाव घेत अंडीफेकचा मुद्दा नेला थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर; IPU काय घेणार अ‍ॅक्शन?

PM Modi, IPU complaint India : घटनेनंतर महुआ यांनी सोशल मीडियात पोस्ट करताना इंटर-पार्लमेंटरी यूनियन या जगातील जुन्या संस्थेलाही टॅग केले आहे. विरोधकांच्या सुरक्षेचा हा मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Rajanand More

Mahua Moitra egg attack : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर बुधवारी अंडीफेक करण्यात आली. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही तृणमूलचे सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह आमदार, पदाधिकाऱ्यांवर अंडी फेकण्यात आली होती. महुआ यांनी हा मुद्दा आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला आहे.

नेमकं काय घडलं?

महुआ मोइत्रा यांनी केलेल्या आरोपांनुसार, कालीगंज येथील तृणमूलच्या कार्यालयावर बुधवारी (ता. १) अंडी, दगड आणि कचरा फेकण्यात आला. त्यामुळे आपण चार तास कार्यालयात अडकून पडलो. भाजप कार्यकर्त्यांनीच हे कृत्य केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपचे झेंडे हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केला आहे. महुआ यांच्या अंगावरही अंडी फेकण्यात आली होती.

घटनेनंतर महुआ यांनी सोशल मीडियात पोस्ट करताना इंटर-पार्लमेंटरी यूनियन या जगातील जुन्या संस्थेलाही टॅग केले आहे. विरोधकांच्या सुरक्षेचा हा मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे बंगालमधील अंडीफेकचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. हा मुद्दा केवळ राजकीय विरोधाचा नाही तर लोकशाहीतील अधिकार आणि खासदारांच्या सुरक्षेशी संबंधित आहे, असे महुआ यांनी म्हटले आहे.

काय आहे IPU?

IPU ही जगभरातील खासदारांसाठीही एक संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे. विविध देशांतील खासदारांमध्ये संवाद वाढविणे, लोकशाही मजबूत करणे, खासदारांच्या अधिकारांचे संरक्षण आदी प्रमुख कामे ही संस्था करते. संस्थेचे सदस्य असलेल्या देशांतील एखाद्या खासदाराच्या तक्रारीवरून आयपीयूची मानवाधिकार समिती त्याची दखल घेऊ शकते. ही संस्था म्हणजे न्यायालय नसले तरी संस्थेचे अहवाल आणि शिफारशी महत्वपूर्ण मानले जातात.

एखाद्या तक्रारीची पडताळणी करून त्यात तथ्य आढळल्यास संस्थेकडून संबंधित देशाची संसद आणि सरकारकडे याबाबत विचारणा केली जाऊ शकते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समिती आपला अंतिम अहवाल प्रसिध्द करते. एखाद्या देशाच्या सरकार किंवा संसदेला दोषी धरणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश नसतो. जगभरातील खासदारांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन आदी बाबींवर प्रकाशझोत टाकण्याचे काम ही संस्था करते.

महुआ यांनी अद्याप अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती नाही. मात्र, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचा फोडली आहे. जगभरातील १८३ देश या संस्थेचे सदस्य असून त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT