

Modi Government news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळातील पहिला फेरबदल लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या फेरबदलामध्ये काही बड्या मंत्र्यांना पदावर पाणी सोडावे लागू शकते. तर नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसू शकतात. यापूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात एकाचवेळी तब्बल १२ मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. तर ४३ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार ७ जुलै २०२१ रोजी झाला होता. या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील चौघांची वर्णी लागली होती. आता तिसऱ्या कार्यकाळातील विस्तारामध्येही महाराष्ट्राला आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झुकते माप दिले जाण्याची दाट शक्यता आहे. शिंदे यांच्या पक्षात नुकतेच उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी प्रवेश केला आहे.
राणे, पाटील, पवार, कराड
२०२१ मध्ये झालेल्या फेरबदलामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना संधी मिळाली होती. त्यावेळी थारचंद गेहलोत, सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल निशंक, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, बाबुल सुप्रियो, संतोष गंगवार, संजय छोत्रे, रतन लाल कटारिया, प्रताप सारंगी आणि देबोश्री चौधरी या मंत्र्यांना नारळ देण्यात आला होता.
मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या एकूण ४३ खासदारांपैकी १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्रातील दोघांचा पत्ता कट करताना चौघांनी शपथ घेतली होती. काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा विचार करून हा फेरबदल करण्यात आला होता. त्यामुळे काही राज्यांना झुकते माप मिळाले होते.
दिग्गज मंत्रिमंडळात
मोदी २.० च्या फेरबदलामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, अश्वनी वैष्णव, भूपेंद्र यादव, किरेन रिजिजू, हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडविया, पुरूषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुराग ठाकूर आदी बड्या नेत्यांची वर्णी लागली होती. या फेरबदलामध्ये एकट्या उत्तर प्रदेशातील ७ नेत्यांना राज्यमंत्रिपद मिळाले होते.
मोदी ३.० फेरबदल
मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या फेरबदलामध्येही मोठी नावे समोर येऊ शकतात. प्रामुख्याने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना डच्चू दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. या विस्तारावरही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे सावट असणार आहे. राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्याच्या अनुषंगाने मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, पंजाब, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यांमधील मोठे चेहरेही मंत्रिमंडळात दिसू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.