West Bengal Politics : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे तीन तुकडे झाले आहेत. सुमारे ६४ आमदार, २० खासदार असे दोन गट आणि ममता बॅनर्जी यांचा वेगळा गट झाला आहे. ममतादीदींचे जुने सहकारी त्यांना सोडून जात आहेत. त्यातच त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या विधानानेही खळबळ उडाली आहे.
महुआ मोइत्रा यांनी एका मुलाखतीत थेट राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे कौतुक करणारे विधान केले आहे. तसेच ते आपले चांगले मित्र असल्याचेही म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. सध्याच्या राजकीय स्थितीत महुआ यांच्या या विधानाने आता चर्चांना उधाण आले आहे. महुआ याही दीदींना सोडून जाणार का, असे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
काय म्हणाल्या महुआ मोइत्रा?
'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत महुआ यांनी म्हटले आहे की, सुवेंदू हे माझे चांगले मित्र आहेत. आम्ही एकाच पक्षात असताना त्यांनी मला खूप मदत केली. मी करीमपूरमधून निवडणूक लढत असताना केवळ तेच माझ्या प्रचाराला आले होते. मला जी मदत हवी होती, ती सर्व करत होते.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीची एक आठवण सांगताना महुआ मोइत्रा यांनी सांगितले की, या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार होते. पण काही कारणांमुळे ते मिळू शकले नाही. मी रात्रभर रडत होते. केवळ सुवेंदू अधिकारी यांनीच मला त्यावेळी मदत केली. बहीण म्हणत सुवेंदू यांनी मी आहे, असे म्हणत आधार दिला होता. हे सर्व भावनिक क्षण असतात. आज आम्ही वेगळ्या पक्षात आहोत. आता बोलणं होत नाही.
दरम्यान, महुआ या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. सध्याच्या राजकीय स्थितीत त्या खंबीरपणे ममतादीदींच्या मागे उभ्या आहेत. अनेक जवळचे नेते सोडून जात असताना महुआ यांच्याकडून त्यांना साथ दिली जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुवेंदू अधिकारी यांच्या विधानांची सध्या राजकारणात चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.