.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Congress news : मागील काही वर्षांत काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. अन्य पक्षांतून काँग्रेसमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांचा आकडा मात्र जवळपास शून्य आहे. अशा स्थितीतही एका बड्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांना नो व्हॅकन्सी म्हणजे पक्षात जागा नाही असे सांगत प्रवेश नाकारण्यात आला. आज तोच नेता एका राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर दिमाखात विराजमान झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेला हे नेते आहेत शुभेंदू अधिकारी. त्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण त्याआधी त्यांची पहिली पसंती काँग्रेसला होती. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांनी 'एएनआय'च्या पॉडकास्टमध्ये तसा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी आणि अधिकारी यांची भेटही झाली होती. पण चर्चा पुढे सरकली नाही.
किडवाई यांनी सांगितले की, भाजपआधी सुवेंदू अधिकारी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित होते. तृणमूल काँग्रेसचे सध्याचे बंडखोर आमदार आणि खासदार आता जे कारण सांगत आहेत, त्यावेळीही तेच कारण होते. अधिकारी यांना राज्यात काँग्रेसचे नेतृत्व करायचे होते. पक्षाचा चेहरा आपल्याला बनवावे, अशी त्यांची इच्छा होती. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या कामाविषयी ते नाराज होते. त्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
राहुल गांधी यांनी अधिकारी यांना सध्या जागा नसल्याचे सांगितल्याचा दावा किडवाई यांनी केला आहे. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. किडवाई यांच्या दाव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कारण अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे ते पक्षाचा चेहरा बनले आणि आता मुख्यमंत्रीही बनले आहेत. अधिकारी काँग्रेसमध्ये असते तर राज्यात काँग्रेसची सत्ता आली असती का, अशीही चर्चा आता झडू लागली आहे.
अधिकारी यांचा भाजपमध्ये दबदबा वाढला तेव्हा अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्यामुळे अधिकारी यांना काँग्रेसमध्ये प्रवेश झाला नाही की सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील चांगले राजकीय संबंध त्यास आडवे आले, अशीही चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.