Pramod Sawant.jpg Sarkarnama
देश

Pramod Sawant Government Cabinet Expansion : गोवा मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, 3 नव्या चेहऱ्यांना संधी ? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

Goa Political Update : राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात मंत्री आणि भाजप आमदारांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. त्‍यामुळे आणखी एका चर्चेला खतपाणी मिळाले आहे.

Deepak Kulkarni

Goa News : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (ता.9) राज्य मंत्रिमंडळात किमान तीन नवे चेहरे समाविष्ट करावे लागतील, असे संकेत दिले आहेत. मंत्री-आमदारांच्या बैठकीत दिल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती मिळाली आहे.

मं​त्रिमंडळ (Cabinet) फेरबदलाबाबत आपण काहीच चर्चा केलेली नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत दिले आहे .

लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील अशी चर्चा होती. भाजप पक्ष संघटनेकडून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व मुख्यमंत्री यांची याविषयी चर्चा झाली होती. चिंबल येथे भाजप (BJP) कार्यालय पायाभरणी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. तेव्हाच या विषयावर चर्चा झाली होती.

मंत्रिमंडळ फेरबदल विधानसभा अधिवेशनाआधी करायचा की नंतर याचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुरूप मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असे ठरवण्यात आले होते. त्याच बैठकीत काही नावांविषयी चर्चा झाली होती.

मुख्यमंत्र्यांनी भाजपचे मंत्री व आमदार तसेच सरकारला समर्थन देणारे आमदार यांची बैठक आज घेतली. त्या बैठकीत विधानसभा अधिवेशनाविषयी चर्चा झाली असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले असले तरी बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात मंत्री आणि भाजप आमदारांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. त्‍यामुळे आणखी एका चर्चेला खतपाणी मिळाले आहे. विधानसभा अधिवेशनापूर्वी तयारीसाठी, विधेयकांची माहिती देण्यासाठी या बैठका होत्या असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी अशा बैठका घेण्याची प्रथा नसल्याने तो विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.

पावसाळी अधिवेशनात संपूर्ण अर्थसंकल्पाला मान्यता मिळवून घेण्यासह आमदारांचे प्रश्न आणि विविध मतदारसंघांतील विकासकामांवर चर्चा करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीआधी दिले होते. त्यातच भाजप मंत्री-आमदारांच्या दिल्लीवाऱ्या अलीकडे वाढल्या आहेत. कोणी मंत्रिपद मिळवण्यासाठी तर कोणी मंत्रिपद टिकवण्यासाठी दिल्लीवारी करत असल्याची दबकी चर्चा सुरू आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी एवढ्यात मंत्रिमंडळ फेरबदल होणार नाही असे जाहीरपणे सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या बैठका घेतल्याने मंत्रिमंडळ फेरबदल विधानसभा अधिवेशनानंतर होऊ शकतो असे संकेत मिळाले आहेत. तानावडे यांनी या विषयावर पक्षाच्या गाभा समितीच्या सदस्यांशी चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. विधानसभा अधिवेशन काळात मंत्रिमंडळ फेरबदल हा विरोधकांच्या हातचा विषय होऊ नये यासाठी फेरबदल लांबणीवर टाकण्याचे प्रदेश पातळीवर ठरवण्यात आल्याचे समजते.

नितीन गडकरी ११ जुलैला गोव्‍यात

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मार्गाचे उद्‌घाटन ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दुसऱ्या दिवशी म्‍हणजे १२ रोजीही गडकरी काही कार्यक्रमांत सहभागी होतील, असे त्‍यांनी सांगितले. यादरम्‍यान भाजपने राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावल्याने मंत्रिमंडळ फेररचनेचा मुद्दा पुन्हा उफाळून आला आहे.

गावडे, हळर्णकर, सिक्‍वेरांवर गंडांतर?

कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर आणि कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा हे बैठकीतून सर्वांत आधी बाहेर गेल्‍याने चर्चा सुरू झाली होती. याबाबत सिक्वेरा यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना हवा असेपर्यंत मी मंत्रिमंडळात असेन. माझ्याविषयीच्या बातम्या मी वाचतो, पण तशी कोणी चर्चाही केलेली नाही. नीलेश काब्राल यांनी सांगितले आपण कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT