Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. गडचिरोलीसारख्या मागास आणि दुर्गम जिल्ह्याचं पालकत्व स्वत:हून त्यांनी स्वीकारलय. मात्र आता विविध समस्यांनी जिल्ह्यातील जनता, महिला, विद्यार्थी युवक त्रस्त असताना फडणवीस दिसेनासे झाले आहेत. त्यामुळं गडचिरोली काँग्रेसनं डफडे बजाव आंदोल करीत त्यांचा निषेध केला.
उपमुख्यमंत्री, गृह आणि ऊर्जा खातं फडणवीस यांच्याकडे आहे. ऊर्जामंत्री असल्यानंतरही गडचिरोलीतील शेतीला नियमित वीजपुरवठा होत नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. रानटी हत्ती आणि वाघांच्या धुमाकुळानं जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहेत. प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याचे मालक असल्याप्रमाणं वागत आहेत. मात्र, पालकमंत्री फडणवीस यांचं याकडं पूर्णतः दुर्लक्ष असल्याची टीका या आंदोलनात करण्यात आली. (Gadchiroli Congress Protest for DCM Devendra Fadnavis Alleged Negligence)
गेल्या अनेक महिन्यांपासून फडणवीस यांनी जिल्ह्याला भेट दिलेली नाही. त्यामुळं संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी फडणवीस यांना पत्र पाठवत किमान दिवाळीचा फराळ घेण्यासाठी तरी यावं, असं निमंत्रण दिलय. गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी हे पत्र लिहलंय. त्यानंतरही फडणवीस यांचा दौरा निश्चित न झाल्यानं काँग्रेसनं डफडे बजाव आंदोलन केलं.
‘पालकमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्यात परत या, जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा द्’, अशी घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. इंदिरा गांधी चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारल्यानं जिल्हावासीयांना फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु त्या फोल ठरत असल्याचं ब्राह्मणवाडे यांनी नमूद केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नक्षलप्रभावित असल्यानं गडचिरोलीच्या समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. जिल्ह्याचा बहुतांश भाग अन्य राज्यांच्या सीमांना लागून आहे. त्यामुळं अशा गावातील नागरिकांना दुहेरी समस्यांचा सामना करावा लागतो. नक्षल्यांचा धोकाही कायम टांगत्या तलवारीसारखा असतो. त्यामुळं जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांचे नियमित दौरे होत राहणं गरजेचं आहे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.
जिल्हा नियोजन समितीसह अनेक समित्यांचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीनं अशा समित्यांमध्ये नियोजन व निधीचं वितरण केलं जातं. त्यासाठी नियमित बैठकी होणं गरजेचं असतं. मात्र, पालकमंत्री गडचिरोलीत येतच नसल्यानं अशा समित्यांचं कामही अधिकारीच चालवत असल्याची काँग्रेसची ओरड आहे. फडणवीस यांनी राज्याचा व्याप सांभाळत गडचिराली जिल्ह्याकडंही लक्ष द्यावं, अशी आग्रही मागणी काँग्रेसची आहे.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.