Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge : विरोधाची वज्रमूठ! ज्ञानेश कुमारांविरोधात मल्लिकार्जुन खर्गेंचे 'जन महाभियोग' अस्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!

Jan Impeachment Motion against Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मल्लिकार्जुन खरगे 'जन महाभियोग' प्रस्ताव मांडणार असल्याची चर्चा आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर.

Rashmi Mane

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवत विरोधकांकडून शुक्रवारी (30 ऑक्टोबर) 'जन महाभियोग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या कार्यक्रमात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रतीकात्मक महाभियोग प्रस्ताव मांडणार आहेत. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी समारोपाचे भाषण करणार आहेत. लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

खरगे यांच्या निवासस्थानी होणार 'जन महाभियोग' कार्यक्रम

इंडिया आघाडीचा हा कार्यक्रम नवी दिल्लीतील मल्लिकार्जुन खरगे यांच्या 10, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 3:30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी कार्यक्रमासाठी अन्य ठिकाणांचा विचार करण्यात आला होता. मात्र, आवश्यक परवानगी न मिळाल्याने अखेर खरगे यांच्या निवासस्थानी कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला.

खरगे प्रस्ताव मांडणार, राहुल गांधी करणार समारोप

या कार्यक्रमाची सुरुवात मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाने होणार असून, ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रतीकात्मक महाभियोग प्रस्ताव सादर करतील. त्यानंतर इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते या प्रस्तावावर आपली भूमिका मांडणार आहेत.

मतदारयादीतील अनियमितता, निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि SIR मोहिमेबाबत विरोधकांच्या तक्रारी या विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे. सर्व नेत्यांची मते मांडल्यानंतर राहुल गांधी समारोपाचे भाषण करतील. त्यानंतर प्रतीकात्मक प्रस्ताव मंजूर करण्याची योजना आहे.

मीरा कुमार यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी

लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन करणार आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची भूमिका निश्चित करण्यासाठी गुरुवारी खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.

SIR आणि 'व्होट चोरी'वरून निवडणूक आयोगाला घेरणार

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (SIR) काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून केली जात आहे.

SCROLL FOR NEXT