Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी नियमानुसार आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं पण त्यांनी राज्यपालांकडं राजीनामा दिला नाही. त्यामुळं त्यांच्या या कृतीकडं आश्चर्यानं पाहिलं गेलं होतं. त्यानंतर आता ममता बॅनर्जींनी आपण माजी मुख्यमंत्री नाही, असा उल्लेख स्वतःच्या सोशलमीडिया बायोमध्ये केला आहे. त्यामुळं आता भलतीच चर्चा रंगली आहे.
निवडणूक हारल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपलं ट्विटर बायो अपडेट केलं आहे. यापूर्वी त्यांच्या बायोमध्ये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष आणि सन्माननीय मुख्यमंत्री पश्चिम बंगाल असा उल्लेख होता. पण आता त्यांनी आपलं बायो अपडेट करताना त्यात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख कायम ठेवला आहे, पण त्यात माजी मुख्यमंत्री असा शब्दप्रयोग टाळला आहे. तर त्याऐवजी त्यांनी मुख्यमंत्री पश्चिम बंगाल (१५वी, १६वी, १७वी विधानसभा) असा उल्लेख केला आहे. त्यांच्या या उल्लेखाचीच आता सर्वत्र चर्चा सुरु आहे.
दरम्यान, आपण पश्चिम बंगालची निवडणूक हारलेलो नाहीत, तर भाजपनं ही निवडणूक चोरली आहे, असं ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच म्हटलं होतं. त्यामुळंच त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला नव्हता. पण त्यांनी राजीनामा दिला नाहीतरी त्यामुळं कुठलाही घटनात्मक पेच निर्माण झाला नाही. कारण मागच्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होताच ती आपोआपच विसर्जित होऊन जाते. पण जर तत्पूर्वीच निवडणूक होऊन त्यात जर तोच पक्ष जिंकला आणि आधीचीच व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री झाली तर तिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता पुढे ५ वर्षांसाठीचा कार्यकाळ वाढवला जातो.
पण ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा आणि त्यांचा स्वतःचा देखील पराभव झाल्यानं सहाजिकच मुदत संपल्यानं आधीची विधानसभा विसर्जित झाली आणि त्याऐवजी नवी विधानसभा सुरु झाली. या विधानसभेसाठी भाजपला बहुमत असल्यानं या पक्षाची सत्ता स्थापन होऊ मुख्यमंत्रीही विराजमान झाला. त्यामुळं ममतांच्या राजीनामा न देण्यामुळं काहीही विशेष फरक पडलेला नाही.