Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठी घडामोड; CM ठरताच राष्ट्रपती राजवट हटली, भाजपने टाकला डाव

President’s Rule Lifted : वाय खेमचंद सिंह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे सुरूवातीच्या काळात ते बिरेन सिंह यांचे समर्थक होते.

Rajanand More

BJP strategy Manipur : मैतेई आणि कुकी समाजातील संघर्षानंतर पेटलेल्या मणिपूरमध्ये भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दोन दिवसांत राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. भाजपकडून मंगळवारी विधिमंडळ नेत्याची निवड केली. त्यानंतर आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावाही करण्यात आला आहे. त्याला काही तास उलटत असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती राजवट उठविल्याची अधिसूचना जारी केली.

मणिपूरमध्ये मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याआधी अनेक महिने सिंह यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत होती. भाजपमधूनही त्यांच्याविरोधात नाराजी निर्माण झाली होती.

दुसरीकडे काही दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. भाजपने ६२ वर्षांच्या युमनात खेमचंद सिंह यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे राज्याचे भावी मुख्यमंत्री तेच असणार हे कालच स्पष्ट झाले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला.

राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा आल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तातडीने राज्यातील राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली. त्यामुळे पुढील काही तासांतच नव्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. वाय खेमचंद सिंह यांची मैतेई समाजातील मोठा नेता म्हणून ओळख आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविल्याची चर्चा आहे.

वाय खेमचंद सिंह हे पाच वर्षे विधानसभेचे सभापतीही होते. त्यानंतर बिरेन सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. २०१३ पासून ते राज्याच्या राजकारणात सक्रीय आहे. स्वच्छ प्रतिमा असल्यानेही भाजपने त्यांना संधी दिल्याचे मानले जाते. मैतेई समाजाप्रमाणे कुकी समाजामध्येही सिंह यांनी आपला जम बसविला आहे. त्यांनी डिसेंबर महिन्यात कुकी मदत केंद्रांचा दौरा करत सूचक संकेत दिले होते.

वाय खेमचंद सिंह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे सुरूवातीच्या काळात ते बिरेन सिंह यांचे समर्थक होते. मात्र, मागील काही महिन्यांत त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट केले होते. विशेष म्हणजे खेमचंद सिंह यांनी बिरेन सिंह यांच्यासोबत २००२ मध्ये डेमोक्रेटिक रिव्हाल्युशनरी पीपल्स पक्षातून आपले राजकीय करिअर सुरू केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT