New Delhi News : माजी पंतप्रधान,कुशल अर्थतज्ज्ञ, नम्र,अभ्यासू,संयमी आणि राजकारणातलं अजातशत्रू राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. मनमोहन सिंह यांचं 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पण या दोन टर्म पंतप्रधान राहिलेल्या नेत्याची यूपीए सरकारच्या अखेरच्या काळातील शेवटच्या पत्रकार परिषदेतलं ते वाक्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
2014 रोजी देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं होतं.त्याचवेळी 2004 पासून सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या यूपीए सरकारविरोधात भाजपनं (BJP) रान उठवलं होतं. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले जात होते. आणि संयमी,शांत स्वभावाच्या सिंग यांच्यावर या भ्रष्टाचाराचे खापर फोडत नरेंद्र मोदींसह भाजपकडून टीकेची झोड उठवण्यात येत होती.
आपल्या दुसर्या टर्ममधील अखेरच्या पत्रकार परिषदेमध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजपच्या जिव्हारी लागणार्या आरोपांना आणि पत्रकारांच्या तिखट प्रश्नांना तितक्याच संयमीपणे उत्तर दिलं. इतिहास माझ्या कामाचं मूल्यमापन उदारतेने करेल असं सिंग यांनी म्हटलं होतं.
त्या पत्रकार परिषदेमध्ये यूपीए सरकारचे 10 वर्षे नेतृत्व केलेल्या मनमोहन सिंग यांनी मीडियाशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून यूपीए सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या कोळसा,2G स्पेक्ट्रम त्याचसोबत CWG घोटाळ्यावरुन पंतप्रधान सिंग यांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आला.
भाजपच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत आलेल्या सिंग यांना पत्रकारांच्या एकापाठोपाठ प्रश्नांच्या सरबत्तीने आणखी घायाळ केले होते.पण तरीही त्यांनी आपला संयम ढळू न देता तितक्याच शांतपणे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यातच सिंग यांना भाजप तसेच नरेंद्र मोदी तुम्हांला कमकुवत पंतप्रधान म्हणून आरोप करतात. तुमच्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला खरंच कमकुवत केले आहे का? असा अग्निपरीक्षा पाहणारा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर सिंग यांनी दिलेलं उत्तर फारच आश्वासक आणि टीकाकारांना सणसणीत चपराक लगावणारं होतं. पत्रकाराच्या प्रश्नानंतर मनमोहन सिंग यांनी काही काळ मौन बाळगलं. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये कुजुबुज सुरू झाली. पण त्यानंतर काही क्षणातच सिंग हे अगदी शांत स्वरात म्हणाले,मी कमकुवत होतो की नाही हे इतिहासच ठरवेल.हेच वाक्य आज सिंग यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेस ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. गुरुवारी (ता.26) रात्री पावणे दहाच्या सुमारास 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला.33 वर्षे राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या मनमोहन सिंग यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. लोकसभा निवडणूक न लढवता देशाचे दोनवेळा पंतप्रधान होण्याचा मान मिळवणारे एकमेव राजकारणी म्हणून त्यांची गणना होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.