Telangana BJP-BRS Sarkarnama
देश

BRS Vs BJP : तेलंगणात मराठी मंडळी आमनेसामने; 'भाजप-बीआरएस'मध्ये चुरस!

Anand Surwase

Telangana Politics : देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये तेलंगणा राज्यात 119 जागांसाठी 30 नोब्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने तेलंगणातील मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे, तर दुसरीकडे हैदराबाद शहरात आपली पाळेमुळे रोवून असलेल्या तेलंगणा मराठा मंडळाने मात्र तेथील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यातून मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप-बीआरसमध्य चुरस वाढल्याचे दिसून येत आहे.

तेलंगणात राज्याच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत. तसेच निजामाच्या राजवटीपासून अनेक मराठी भाषिक लोक हैदराबाद, जहिराबाद या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. तेलंगणातील अंबरपेठ, लिंगमपल्ली, विकराबाद, जहिराबाद, मुशीराबाद, गोशामहल, राजेंद्रनगर, एलबीनगर, उप्पल, अंबरपेठ या मतदारसंघासह निझामाबाद अदिलाबाद, मेहबूबनगर, मेडक या सीमेजवळच्या जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

महाराष्ट्रातील नेते तेलंगणात

तेलंगणात सध्या केसीआर यांच्या बीएआरएसची एकहाती सत्ता आहे. मात्र, यंदा काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जोरदार ताकद लावण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून मराठी मतदारांची संख्या जास्त आहे, त्या मतदारसंघात प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना तेलंगणाच्या दौऱ्यावर पाठवले आहे. यामध्ये सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, आमदार नितेश राणे, महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेलंगणात प्रचार करताना दिसून येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा मंडळाचा बीआरएसला पाठिंबा

तेलंगणामध्ये अंबरपेठ, लिंगमपल्ली, विकराबाद, जहिराबाद, मुशीराबाद, गोशामहल, राजेंद्रनगर, एलबीनगर, उप्पल, अंबरपेठ या मतदारसंघासह निझामाबाद अदिलाबाद, मेहबूबनगर, मेडक या सीमेजवळच्या जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांसह इतर मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व मराठी भाषिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तेथील काही मराठी भाषिकांनी एकत्र येत तेलंगणा मराठा मंडळाची स्थापना केली आहे.

या मंडळाशी लाखो मराठी भाषिक जोडले गेले आहेत. तसेच केसीआर यांच्याकडूनही या मंडळाच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या समस्या सोडवण्यास नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रकाश पाटील, श्रीनिवास निकम, दिलीपकुमार जगताप, मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तेलंगणा मराठा मंडळाने बीआरएसला पाठिंबा देत प्रचाराला सुरुवात केली आहे.

तेलंगणातील मराठी मतदार

हैदराबादमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये गोशामहल या मतदारसंघात 20 हजार, राजेंद्रनगरमध्ये 22 हजार, रंगारेड्डी, जगतगिरीगुट्टा, पंचशीलनगर या भागात 20 हजार, तसेच एलबीनगर आणि उप्पल या मतदारसंघात जवळपास 20 ते 24 हजार मराठी मतदार वास्तव्यास आहेत. तसेच अंबरपेठ या मतदारसंघातही 12 हजार मराठी भाषिकांचे मतदान आहे. यासह हैदराबाद शहराबाहेरील जिल्ह्यातही सुमारे 50 हजार मराठी मतदारांची संख्या आहे. या सर्व मतदारांना तेलंगणा सरकारकडून सर्व सुविधा आणि योजनांचा लाभ प्राप्त होतो.

तेलंगणा विधानसभा मतदारांची आकडेवारी

निवडणूक आयोगाकडील नोदींनुसार तेलंगणामध्ये सध्या एकूण तीन कोटी 17 लाख 32 हजार 727 मतदार मतदानास पात्र आहेत. यामध्ये 18 वर्षे पूर्ण होऊन पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांची संख्या पाच लाख 32 हजार 990 इतकी आहे. तसेच चार लाख 43 हजार 943 हे ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत, तर दोन हजार 557 मतदार हे तृतीयपंथी आहेत.

2018 मधील विधानसभा निकाल

2018 मध्ये केसीआर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राज्यात मुदतपूर्व निवडणुकाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला 88 जागांवर विजय मिळाला होता, तर काँग्रेस युतीला 21 जागांवर समाधान मानावे लागले होते, तर दुसरीकडे सर्व 119 जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ 1 जागेवर विजय मिळाला होता. विशेष म्हणजे त्यावेळी केंद्रातील दिग्गज नेत्यांची फळी प्रचारासाठी तेलंगणात उतरली होती. तसेच या निवडणुकीत औवेसी यांच्या एमआयएम पक्षाला 7 जागांवर विजय मिळाला होता.

तेलंगणामध्ये 119 जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार असून, राज्यात 35,356 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT