Solapur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकीची महापूजा सुरळीतपणे पार पडली. त्या मागे प्रशासनातील पाच उच्चधिकाऱ्यांनी पडद्यामागे राहून घेतलेले कष्ट महत्त्वाचे ठरले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टोकाचा विरोध असताना या अधिकाऱ्यांनी टाकलेली पावले यशस्वी होत गेली आणि फडणवीसांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेतील अडथळेही बाजूला होत गेले. त्यामुळे 2018 प्रमाणे होऊ घातलेली नाष्मुकी टळली आहे. (Pandharpur Wari : Devendra Fadnavis' Kartiki Mahapooja and Five Officers of Solapur)
गेल्या वर्षी एकच उपमुख्यमंत्री असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकीला विठ्ठलाची शासकीय महापूजा बिनाबोभाट झाली होती. मात्र, या वर्षी राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची महापूजा कोण करणार, असा सवाल उपस्थित होत असतानाच मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. सकल मराठा समाजाकडून उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होण्यास विरोध दर्शविण्यात आला होता, त्यामुळे कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार का आणि ते भाग्य कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या नशिबी आहे, याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विशेष म्हणजे 2018 मध्येही मराठा आरक्षणाचा विषय असाच तापला होता. तेव्हाही आषाढीच्या महापूजेसाठी फडणवीसांना विरोध झाला होता. त्यावेळचे वातावरण पाहून फडणवीसांनी पंढरपूरला महापूजेला येण्याचे टाळले होते, पण विरोधानंतरही यंदाची कार्तिकी महापूजा झाली आणि त्या सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळत गेला.
जेमतेम चार महिन्यांपूर्वी सोलापुरात आलेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरळीतपणे व्हावी, यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, पंढरपूरचे प्रातांधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांची मोलाची साथ मिळाली.
या उच्चस्पद अधिकाऱ्यांच्या टीमने मराठा आरक्षण आंदोलकांशी सातत्याने चर्चा केली. विशेष म्हणजे या सर्व चर्चेचा तपशील ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवत राहिले. प्रत्येक फेरीगणिक झालेली चर्चा ही थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचत होती.
अंतरवाली सराटीत झालेली चूक सोलापूरच्या प्रशासनाने टाळली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संवादाच्या फेऱ्या सुरू राहण्यास मदत झाली. या अधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आणि कार्तिकी महापूजेचा विषय अत्यंत संवदेनशीलपणे हाताळला. त्यात मराठा समाजाचे समाधान करण्यात या टीमला यश आले. खरं आशीर्वाद यांना चार, तर सरदेशपांडे यांना सोलापूरला येऊन एक वर्ष झालं होतं. पण येथील परिस्थिती त्यांनी ओळखून हा नाजूक विषय सफाईदारपणे सोडवला.
अधिकाऱ्यांच्या या टीमला आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह सर्वच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी साथ दिली. त्यामुळे फडणवीसांच्या हस्ते कार्तिकीला विठ्ठलाची महापूजा सुरळीतपणे पार पडली.
फडणवीसांची आंदोलकांशी एक तास चर्चा
सकल मराठा समाजाशी सुरुवातीला पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांनी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद, पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांच्याशी चर्चा केली. या सर्व चर्चेचा तपशील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचविण्यात येत होता. त्यांनीही स्वतः आंदोलकांशी एक तास चर्चा केली. त्या चर्चेतून पंढरपूर येथे मराठा भवन बांधणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ संदर्भातील प्रश्न सोडविणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह या प्रमुख मागण्यांना दिशा मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.