Markandey Katju Ishq Karo Party Sarkarnama
देश

Ishq Karo Party : मार्कंडेय काटजूंची ‘इश्क करो पार्टी’ वेधतेय लक्ष; 'TMC'च्या महुआ मोइत्रांना दिलं खुलं आमंत्रण!

Former Supreme Court judge Katju party announcement: माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी ‘इश्क करो पार्टी’ या नावाने राजकीय पक्ष काढण्याची घोषणा करताच, कॉकरोच जनता पक्षावर जोरदार टीका केली.

Pradeep Pendhare

Markandey Katju new political party : देशात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या नावाची चर्चा रंगत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

‘इश्क करो पार्टी’ या अनोख्या नावाने पक्ष स्थापन करत असल्याचे जाहीर करत काटजू यांनी हा देशातील गंभीर प्रश्नांवर उपाय शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचा दावा केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून त्यांनी या नव्या पक्षाची घोषणा केली. याचवेळी त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि तिचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दिपके यांचा उल्लेख थेट ‘मूर्ख’ असा करत काटजू यांनी त्यांच्या मागण्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काटजू म्हणाले, अभिजीत दिपके हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पण एखादा मंत्री (Narendra Modi) गेला तर त्याच्या जागी दुसरा मंत्री येईल. त्यामुळे नेमका काय फरक पडणार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘इश्क करो पार्टी’बाबत बोलताना काटजू यांनी सांगितले की, देशातील गरिबी, कुपोषण, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता यांसारख्या गंभीर समस्या केवळ जनतेच्या एकजुटीनेच दूर होऊ शकतात. नव्या पक्षाच्या माध्यमातून या प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या घोषणेदरम्यान काटजू यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनाही पक्षात सहभागी होण्याचे खुले आमंत्रण दिले. त्यांच्या या आवाहनामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मार्कंडेय काटजू यांचा सार्वजनिक आणि न्यायिक प्रवासही तितकाच उल्लेखनीय राहिला आहे. 2006 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि 2011 मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. याशिवाय अलाहाबाद, मद्रास आणि दिल्ली उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

न्यायालयीन सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही काटजू हे सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर परखड भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. आता ‘इश्क करो पार्टी’च्या घोषणेमुळे त्यांनी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, महुआ मोइत्रा यांना दिलेल्या खुल्या आमंत्रणामुळे या नव्या राजकीय प्रयोगाची चर्चा देशभर रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT