Delhi Pollution  Sarkarnama
देश

राजधानी पुन्हा लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता, शाळाही बंद ठेवाव्या लागण्याची चिन्ह

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) हवेतील घातक प्रदूषण रविवारी पुन्हा वाढल्याने दिल्ली सरकार धास्तावले आहे. या विषारी हवेपासून बालके, मुले व ज्येष्ठ नागरिकांचा जीव वाचवायचा असेल तर काही दिवस तरी पुन्हा लाॅकडाऊन लावावा व शाळाही बंद ठेवाव्यात असा सल्ला पर्यावरण तज्ज्ञांसह विविध जाणकारांनी दिला आहे.

लंग केयर फाउंडेशनच्या अभ्यासानुसार फक्त दिल्लीत आज दर तीनामागे एका बालकाला दमा किंवा गंभीर श्वसन विकार असतात. दर वर्षी ऑक्टोबरनंतर फेब्रुवारी संपेपर्यंत भारताची ही राजधानी अतिविषारी वायूच्या विळख्यात असते. कोट्यवधींच्या फटाक्यांचा धूर केल्यावाचून दिल्लीकरांना चैन पडत नाही, प्रदूषण घातक स्थितीत गेल्यावर केंद्र व दिल्ली राज्य सरकारमध्ये आरोपांची टोलवाटोलवी होते, चार बैठकांचे आन्हीक पार पाडले जाते व परिस्थिती जैसे थे रहाते हा गेल्या अनेक वर्षांत दिल्लीकरांचा अनुभव आहे. यंदाही दिवाळी होताच त्याची पुनरावृत्ती होत आहे. मात्र यंदा वाहने व नवीन बांधकामांच्या प्रदूषणानेही धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंतेचे सार्वत्रिक वातावरण असून नागरिकांना घराबाहेर पडताच श्वसनास त्रास होणे व डोळे जळजळणे हे त्रास सर्रास अनुभवायला मिळत आहेत.

दिल्लीत दर वर्षी फक्त प्रदूषणाने २५ लाख लोकांचा मृत्यू होतो व ही संख्या वर्षागणिक वाढत चालली आहे. दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान केवळ वायू प्रदूषणाने किमान साडेनऊ वर्षांनी घटल्याचे पर्यावरण अभ्यासक विमलेंदू झा यांनी सांगितले. ग्रीनपीस संस्थेच्या म्हणण्यानुसार २०२० मध्ये भारतात कडक लॉकडाऊन होता तरीही लाखो लोकांनी प्रदूषणाने प्राण गमावले. जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार जगातील सर्वाधिक 30 प्रदूषित शहरे एकट्या भारतात आहेत. दिल्लीसह या साऱ्या शहरांत २.५ इतक्या अतीसूक्ष्म विषारी वायूकणांचे (पीएम) प्रमाण व त्यांची घनता अतीशय वाढलेली आहे. सारा उत्तर भारतच प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला आहे.

दरम्यान फटाके व शेतातील काडीकचरा जाळणे हे प्रदूषणासाठीचे मुख्य घटक असले तरीही ते एकमेव कारण नसल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. इतर कारणांत , दिल्लीतील बांधकामांमध्ये झालेली प्रचंड वाढ, त्यांच्यावरील बंदीची ऐशीतैशी, रस्त्यांवर धूर ओकत जाणाऱ्या लाखो गाड्यांमध्ये दिवसागणिक होणारी प्रचंड वाढ, वीजनिर्मिती प्रकल्प वऔद्योगिक प्रदूषण हेही घटक दिल्लीची हवा अतिविषारी बनविण्यात तेवढेच मोठे योगदान देतात. दिल्लीत सध्या सेंट्रल व्हिस्टा व नवीन संसद भवनासह अनेक मोठमोठी सरकारी बांधकामे व पाडापाडीही सुरू आहे. फटाक्यांच्या धुरातून जे १५ विषारी घटक थेट हवेत मिसळतात तेच वाहनांच्या धुरातूनही हवेत मिसळतात असेही अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
आहे.

झा यांच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात दिल्लीतील प्रदूषणाला फटाके व पराली हे दोन्ही कारणीभूत असले तरी हे तात्कालिक आहे. दर वर्षी फेब्रुवारीत हे दोन्ही नसते तरीही दिल्लीतील एक्युआय 300 च्या पुढे म्हणजे गंभीर श्रेणीत असतो. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांतर्फे गेली तीस वर्षे दिल्लीत प्रदूषण विरोधी मोहिमा सुरू आहेत व समस्या उग्र झाली आहे, याला ही सारीच सरकारे जबाबदार आहेत असे झा म्हणाले.

गेली पंचवीस वर्षे राजकीय वृत्तांकन करणारे सईद अंसारी यांच्या मते दिल्ली एनसीआर मधील घातक प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी गांभीर्य, राजकीय एकवाक्यता आणि सामंजस्य आवश्यक आहे आणि नेमका त्यांचा अभाव दिल्लीत एक नव्हे तर अनेक दशके दिसत आहे. हा जगण्या-मरण्याचा प्रश्‍न बनला असताना त्यात राजकारण आणि धर्म आणणे चुकीचे आहे, असेही अंसारी यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT