दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्र -एनसीआरमध्ये दिवाळीनंतर हवा प्रदूषणाची पातळी आज काहीशी खाली आल्याने दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही या दूषित हवेमुळे दिल्लीकरांना श्वास घेणे अवघड जात आहे. पण अशा जीवघेण्या प्रदूषणाच्या मुद्दावरून दिल्लीकर सध्या राजकारणाचा अनुभव घेत आहेत. राज्यातील सत्तारूढ पक्ष आप आणि केंद्रातील सत्तारुढ पक्ष भाजप हे दोघेही या प्रदूषणासाठी एकमेकांना जबाबदार धरु लागले आहेत.
दिल्लीत यंदा बंदी झुगारून केलेल्या फटाकेबाजीमुळे प्रदूषणाची जीवघेणी समस्या उद्भवली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या दाव्यानुसार आज जोरदार वाऱ्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक शुक्रवारच्या ४६२ अंकांवरुन ४४९ पर्यंत किंचित सुधारला आहे, पण अजूनही दिल्ली ‘एनसीआर’ची आणि ‘एनसीआर’ परिसराची हवा अतिविषारी किंवा अतिघातक याच श्रेणीत मोडत आहे. सात आश्चर्यांपैकी एक असलेला ऐतिहासिक ताजमहाल अगदी १०० मीटरवरूनही दिसणे दुरापास्त झाले आहे.
या सगळ्या परिस्थितीला भाजप नेते जबाबदार असून त्यांनीच बंदी झुगारुन फटाके उडवण्यासाठी उघड चिथावणी दिल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. केजरीवाल सरकारला बदनाम करण्यासाठीच ही फटाकाबंदी मोडण्याचे आवाहन केंद्रातील भाजप खासदार आणि नेत्यांनी जाहीरपणे केले असा आरोप पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केला. तर केजरीवाल सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेले स्मॉग टॉवर्स कुचकामी ठरल्याचा आणि केजरीवाल सरकारने फक्त जाहिरातबाजीवरच कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजप नेते श्याम जाजू यांनी केला आहे.
या सगळ्यावर दिल्लीचे प्रदूषण हा राजकारणाचा विषय नसून दिल्लीकरांना जिवंत ठेवण्यासाठी केंद्र सरकार तसेच दिल्ली आणि शेजारच्या राज्यांमधील सर्व पक्ष आणि सरकारांनी वेळ निघून जाण्याआधीच गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे, असे पर्यावरणतज्ज्ञांनी सर्वच राजकीय पक्षांना बजावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.