Indian students in Ukraine Sarkarnama
देश

युक्रेनमधून परतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

रशियाने युक्रेनविरोधात युध्द पुकारल्याने हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरोधात युध्द (Russia -Ukraine War) पुकारल्याने हजारो भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणले जात असून, यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीयचे आहेत. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता मोदी सरकारने (Modi Government) युक्रेनधून परतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. (Russia Ukraine War Update)

युक्रेनमधून परतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी बंधनकारक असलेली १२ महिन्यांची इंटर्नशीप आता भारतात पूर्ण करता येणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आगोयाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी त्यांना 'फॉरेन मेडिकल गॅज्युएट एक्झॅम' ही परीक्षा द्यावी लागेल. याआधी नोव्हेंबर २०२१ मध्येही आयोगाने अशी मुभा दिली होती. कोरोना महामारीमुळे त्यावेळी परदेशातून परतलेल्या एमबीबीएसच्या भारतीय विद्यार्थ्यांना अशी संधी देण्यात आली होती.

याबाबत आयोगाने म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत युक्रेनमध्ये शिकणाऱ्या एमबीबीएसच्या भारतीय विद्यार्थ्यांना इंटर्नशीप करता येणार नाही. त्यामुळे त्यांना भारतात हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोरोना महामारी अथवा युद्ध यासारख्या गोष्टी आपल्या हातात नसतात. ही आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना भारतात इंटर्नशीपसाठी पात्र मानले जाईल. 'फॉरेन मेडिकल गॅज्युएट एक्झॅम' ही परीक्षा पार केल्यानंतर ते संबंधित राज्यांच्या वैद्यकीय आयोगाकडे यासाठी अर्ज करू शकतील.

कोरोनाविषयक नियमावली शिथील

दरम्यान, युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीयांना आणण्यासाठी सरकारकडून मोठी पावले उचलली जात आहेत. यासाठी सरकारने कोरोनाविषयक (Covid-19) नियमावलीमध्ये बदल केला आहे. पूर्व युरोपीय देशांतून परतणाऱ्या भारतीयांना या नियमावलीमध्ये मोठी सूट देण्यात आली आहे. त्यांना तेथून विमानाने येताना आरटी-पीसीआर अहवाल आणि कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक नाही. एअर सुविधा पोर्टलवर त्यांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल सादर न करणारे आणि कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची भारतात परतल्यानंतर चाचणी करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT