meera borwankar sarkarnama
देश

Meera Borwankar News : 'अजितदादांचं नाव पुस्तकात कुठेच नाही, पण...'; बोरवणकरांनी सगळं सांगितलं...

Meera Borwankar On Madam Commissioner Book : पुण्यातील येरवडा येथील पोलिसांच्या जागेवरून मोठा वाद रंगला आहे. माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी यावरून अजित पवार गटावर गंभीर आरोप केला आहे.

Sachin Fulpagare

Meera Borwankar Book : 'लिलावाची एक प्रक्रिया झाली आहे. एक बिल्डर येतो आणि जागेची मागणी करतो. त्यावेळी पुणे पोलिसांची प्रतिनिधी म्हणून मी ती जागा बिल्डरला देण्यास नकार दिला. ती पोलिसांची जागा आहे आणि त्यावेळी दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त होते. त्यांना कार्यालय नव्हतं. पोलिसांच्या घरांची मोठी समस्या आहे, तर ती पोलिसांची जागा पोलिसांकडेच राहू द्या, असं मी म्हटलं होतं. पण हे एक सामान्य प्रकरण आहे. आणि येरवड्याच्या या जागेवरून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय', आसा आरोप माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला. बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

'अजितदादा यांचं नाव मी पुस्तकात कुठेच घेतलेलं नाही. पण त्यावेळी ते पुण्याचे पालकमंत्री होते. हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर तुम्ही जागा द्या, असं मला अजितदादांनी सांगितलं. पण माझ्या आधीचे जे आयुक्त होते. ते या सर्व प्रक्रियेत आणि बैठकांना उपस्थित होते. मग त्यांनी ती जागा का दिली नाही? आणि मला का सांगण्यात आलं', असा सवाल बोरवणकर यांनी उपस्थित केला. 'पुस्तकात जो उल्लेख आहे 'दादा' म्हणून तो अजित पवारांचाच आहे. आणि ते पालकमंत्री होते', असं बोरवणकर यांनी स्पष्ट केलं.

'अजित पवार गटाकडून अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येणार आहे तुमच्यावर? यावरही बोरवणकर यांनी उत्तर दिलं. त्यांची इच्छा, त्यांनी पाठवावी नोटीस. मुळात कोणी पुस्तक वाचलेलंच नाही. पुस्तक न वाचताच सगळे बोलत आहेत. पुणे पोलिसांच्या जागेचा लिलाव अजितदादांनी केला, अशी हेडलाइन्स दिली. पण तसं झालेलंच नाही. विभागीय आयुक्त बंड यांनी स्वतः या लिलावाची जबाबदारी घेतली', असं बोरवणकर म्हणाल्या. 'ज्यावेळी मी पोलिसांची जागा हस्तांतर करण्यास नकार दिला तेव्हा मला बोलावण्यात आलं होतं', बोरवणकर यांनी सांगितलं. 'तुमच्यामुळे आपली जागा वाचली', असे अनेकांचे फोन आल्याचं म्हणाल्या.

'मॅडम कमिशनर' या माझ्या पुस्तकात एकूण ३८ प्रकरणं आहेत. हा एका महिला पोलिस अधिकाऱ्याचा प्रवास आहे. महिला अधिकारी म्हणून पोलिस प्रशिक्षण किती अवघड होतं, हॉर्स रायडिंग, रॉक क्लायम्बिंग, साहित्य घेऊन नऊ-नऊ तास धावायला लावायचे आणि जंगलातील रात्र, अशा सगळ्या गोष्टींबाबत लिहिलं आहे. महिला आणि मुलींसाठी पोलिस खातं हे एक आव्हानात्मक आहे. त्याबद्दल पुस्तकात काही प्रकरणं आहेत', अशी माहिती मीरा बोरवणकर यांनी दिली.

'महिलांवरील अत्याचार आणि हत्यांची चार प्रकरणं, जळगाव सेक्स स्कँडल, हैदराबादची मोठी घरफोडी मुंबईच्या गुन्हे शाखेने पकडली. या प्रकरणांचा केलेला तपास या पुस्तकात आहे. यात सर्वाधिक संवेदनशील प्रकरण वाटलं ते एकतर्फी प्रेमातून एका इंजिनीअरिंग करणाऱ्या तरुणाच्या हत्येच्या प्रकरणावर लिहिलं आहे. पोलिस अधिकारी असताना भ्रष्टाचाराचा कसा सामना केला? याबद्दल लिहिलं आहे. पोलिस खात्यात आणि प्रशासनातही भ्रष्टाचार आहे. त्याच्याशी मी कसा लढा दिला, हे मी सांगितलेलं आहे. मानवी तस्करी म्हणजे तरुण मुले-मुलींचा छळ कशा प्रकारे केला जातो? याबद्दल मी पुस्तकात लिहिल्याचं बोरवणकर म्हणाल्या.

मी पुस्तकात वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि केसेसवर ३८ प्रकरणं लिहिली आहेत, पण सध्या एकाच चॅप्टरबद्दल सतत चर्चा होत आहे. येरवडा येथील जागेचा लिलाव शासनाने केला आणि पुणे पोलिसांनी त्याला विरोध केला. फक्त याबद्दल हे पुस्तक नाही. लैंगिक भेदभाव, प्रशासन, उत्कृष्ट तपास, मानवी तस्करी महिला, मुलींचे शोषण आणि गुन्ह्यांच्या प्रकरणात न्याय मिळण्यात होणारा विलंब, याबाबत या पुस्तकात लिहिलेलं आहे. मुलींनी आणि महिलांनी नक्की वाचावं. आणि ज्यांना कुणाला प्रशासनात रस त्यांनी हे पुस्तक वाचावं, असं आवाहन मीरा बोरवणकर यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT